Bigg Boss Marathi Ankita Walawalkar : अंकिता वालावलकर म्हणजेच ‘कोकण हार्टेड गर्ल’ ‘बिग बॉस’मुळे आता महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली आहे. तिने ग्रँड फिनालेमध्ये थाटात एन्ट्री घेतली मात्र, कमी मतांमुळे अंकिताला टॉप-५ मध्ये पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. विजेतेपद हुकलं असलं तरीही अंकिताच्या खेळाचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
शोमध्ये ( Bigg Boss Marathi ) प्रवेश केल्यावर अंकिताने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, ‘कोकण हार्टेड बॉय’ नेमका कोण आहे याचा उलगडा तिने अद्याप केला नव्हता. अखेर ‘बिग बॉस’च्या घरात आपल्या चाहत्यांना पहिली हिंट देत अंकिताने तिचा होणारा नवरा संगीत दिग्दर्शक असल्याचं सांगितलं होतं. आता घराबाहेर आल्यावर तिला ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर अंकिताने काय खुलासा केला आहे जाणून घेऊयात…
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “कुरूप वेडा ठरवू नका”, सूरज चव्हाण जिंकला म्हणून टीका करणाऱ्यांना किरण मानेंचं जबरदस्त उत्तर; म्हणाले, “बुक्कीत टेंगुळ आणणारा तो…”
‘कोकण हार्टेड बॉय’ची प्रतिक्रिया काय होती?
‘कोकण हार्टेड बॉय’ची तुझ्या ‘बिग बॉस’ मधल्या प्रवासाविषयी ( Bigg Boss Marathi ) काय प्रतिक्रिया होती असा प्रश्न तिला विचारण्यात आला यावर अंकिता म्हणाली, “कोकण हार्टेड बॉयने मला घरात येण्याआधीच सांगितलं होतं, जिंकण्यासाठी जाऊ नको… म्हणजे थोडक्यात त्याचं असं म्हणणं होतं की, आता जिंकायचंय म्हणून फेक वागू नकोस. तू जशी आहेस तशीच घरात राहा. अगदी एक-दोन आठवड्यांमध्ये बाहेर आलीस तरी काहीच प्रॉब्लेम नाही पण, जशी आहेस तशीच घरात राहा. ‘कोकण हार्टेड बॉय’ मला बाहेर आल्यावर म्हणाला छान खेळलीस…तुझं सर्वत्र कौतुक होतंय. आता लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे मला ‘महाराष्ट्र हार्टेड गर्ल’ असं बिग बॉसने म्हटलंय. या सगळ्याचा आनंद त्याला खूप जास्त होता.”
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “अंकिताशी यापुढे मैत्री होणार नाही” घराबाहेर आल्यावर अभिजीतचं मोठं वक्तव्य! म्हणाला, “निक्की माझी…”
लग्न केव्हा करणार?
पुढे, “लग्न कधी करतेस आणि कोकण हार्टेड बॉय कोण आहे?” याबद्दल सांगताना अंकिता ( Ankita Walawalkar ) म्हणाली, “कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे हे तुम्हाला लवकरच कळेल आणि लग्न फेब्रुवारीच्या आधी करण्याचा माझा विचार होता पण, सध्या आता खूप कामं आहेत. आता बघु सगळं कसं काय जमतंय. फेब्रुवारीच्या आधी संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच कळेल कोकण हार्टेड बॉय कोण आहे.”
“मी लग्न सिंधुदुर्गातच करेन…लग्न छोटं असेल पण, मुंबईत येऊन मी सर्वांना रिसेप्शन पार्टी देईन आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना नक्की बोलावेन…खास आमंत्रण देईन” असं अंकिताने सांगितलं.
दरम्यान, अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ नेमका कोण आहे? याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आता त्याच्याबरोबर अंकिता पहिला फोटो केव्हा शेअर करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.