Bigg Boss Marathi Fame Ankita Walawalkar And Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेले सगळे स्पर्धक सध्या सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावी जात आहेत. वैभव, इरिना, धनंजय, जान्हवी हे सगळेजण दिवाळीत मोढवे गावी गेले होते. यानंतर नुकतीच अंकिता सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावी पोहोचली होती. त्याला भेटून आल्यावर अंकिताने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो ‘कोकण हार्टेड गर्ल’ने सूरजला टॅग करून शेअर केले होते. मात्र, या पोस्ट अवघ्या १२ तासांच्या आत सूरजच्या अकाऊंटवरून हटवण्यात आल्या. यापूर्वी तिला सूरजच्या इन्स्टाग्रामवरून अनफॉलो देखील करण्यात आलं होतं.
अंकिताच्या सर्व चाहत्यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर तिने ‘माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात’ अशा आशयाचा व्हिडीओ युट्यूबवर शेअर करत सूरजच्या गावी नेमकं काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. अंकिताने गावी जाण्याआधी सूरजला आता तासाभरात पोहोचेन असं फोन करून सांगितलं होतं पण, तेव्हाच सूरज नेमका नदीवर अंघोळ करायला गेला. यावेळी अंकिताने जवळपास त्याची तासभर वाट पाहिली. यानंतर सूरज आला तेव्हा त्याच्या जवळच्या लोकांनी, ‘तो आलाय उठा, उभे राहा’ असं सांगितलं. यानंतर अंकिताला काहीसा धक्का बसला… सूरज अंकिता व त्याच्या दाजींना न भेटताच थेट घरात केला. काही वेळाने तुम्ही आता सूरजला भेटा असं अंकिता व तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सांगण्यात आलं. या दोघांनी त्याची भेट घेतली. या संपूर्ण प्रकरणी “माझा सूरजवर अजिबातच राग नाहीये. सूरज अत्यंत साधा असल्याने तो इतर लोक सांगतील तसा वागतोय” असं ठाम मत अंकिताने मांडलं आहे.
अंकिताला सूरजच्या गावी गेल्यावर काय अनुभव आला?
अंकिताने घरी आल्यावर फोन करून घडल्याप्रकरणी सूरजला जाब सुद्धा विचारला. ती फोनवर म्हणाली, “सूरज आतमध्ये ( बिग बॉसच्या घरात ) तुला काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्याच आता पुन्हा सांगतेय. तू जे काही करशील ते फार सांभाळून कर. तुझ्याकडे मोबाईल नाही, तू तुझं अकाऊंट वापरत नाही सर्व मला मान्य आहे पण, हे जे घडतंय ते आता सारखं-सारखं होतंय. असं वाटतंय…तुझ्यापासून मला लांब ठेवणं त्यांना योग्य वाटतंय. मग मी लांब होते…यापुढे तू जे काही करशील ते व्यवस्थित कर. काही लागलं तर नक्की फोन कर. सोशल मीडियावर अनफॉलो करणं, तुझ्याशी बोलू न देणं या गोष्टी वारंवार माझ्याबरोबर होत आहेत. हे इन्स्टाग्राम पोस्ट काढून टाकणं…हे सतत होतंय.”
“मी तुला चांगलं ओळखते…मी तुझ्याकडे आले तेव्हा तू आम्हाला न भेटता आत गेलास…मग आम्हाला घरात या…आता त्याला भेटा असं काही वेळाने सांगितलं. तू असा नाहीयेस सूरज. तुझ्या जवळची माणसं तुला भेटायला येतात तेव्हा तू धावत त्यांच्याजवळ येतोस. पण, असं घडलं नाही…मी तासभर तुझी वाट पाहात होते. मी ७० दिवस तुला पाहिलंय…त्यामुळे तू तुझ्या डोक्याने चाल. सांभाळून वाग…मी तुझ्यावर अजिबात रागावले नाही. तू हक्काने माझ्याकडे राहायला ये…लग्नाला ये. फक्त मी आता सर्वांना सांगितलंय सूरजच्या अकाऊंटवरून माझ्याबाबतीत काही झालं तरी यावरून मला प्रश्न विचारत जाऊ नका. कारण, मला माहितीये हे तू करत नाहीयेस तुझ्या आजूबाजूचे लोक हे सगळं करत आहेत. त्यामुळे तुझा कोणी गैरफायदा घेऊ नये एवढंच मला वाटतं.” असं अंकिताने फोनवर सूरजला सांगितलं.
दरम्यान, अंकिताने फोन केल्यावर सूरजने तिची लगेच माफी मागितली. पण, या सगळ्याबद्दल ‘कोकण हार्टेड गर्ल’ने कोणताही दोष सूरजला दिलेला नाही. त्याचा फोन सतत दुसऱ्याच्या हातात असतो असंही तिने सांगितलं. तसेच यानंतर या विषयावर मी काहीच बोलणार नाही असंही तिने स्पष्ट केलं आहे.