Bigg Boss marathi : मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखलं जातं. यंदा पहिल्यांदाच रितेश ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचं होस्टिंग करत आहे. यापूर्वीचे चार सीझन महेश मांजरेकरांनी होस्ट केले होते. त्यामुळे रितेश ही जबाबदारी कशी सांभाळणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलं होतं. सध्या शोला आणि विशेषत: भाऊच्या धक्क्याला चांगला टीआरपी असल्याने रितेशचं कौतुक करण्यात येत आहे. परंतु, घरातील काही सदस्यांना रितेशने आणखी कठोर शब्दांत झापलं पाहिजे असं काही प्रेक्षकांचं मत आहे. याबाबत आता एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या पत्नीने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर आतापर्यंत निक्की, जान्हवी, अरबाज, वैभव अशा सगळ्याच सदस्यांची शाळा घेतली आहे. परंतु, त्याने आणखी कठोर शब्दांत ‘ए’ टीमच्या सदस्यांना ओरडलं पाहिजे अशी इच्छा अनेकांची आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने जान्हवीची जबरदस्त शाळा घेऊन तिची रवानगी जेलमध्ये केली. मात्र, कितीही ठरवलं तरीही रितेशला ठरवून अपमान करता येत नाही. कारण, त्याचा स्वभावच गोड आहे असं मत मांडत अंशुमन विचारेची पत्नी पल्लवीने रितेशसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”

Bigg Boss Marathi : अंशुमन विचारेची पत्नी पल्लवीची पोस्ट

काही माणसं जन्मालाच इतकी गोड येतात की, त्यांना ठरवून, अभिनय म्हणून सुद्धा कुणाचा अपमान करता येत नाही. सगळे रितेश देशमुखवर चिडत आहेत की, त्याला या लोकांशी घालून पाडून, रागात, त्यांची लायकी काढून बोलता येत नाही. पण, कुणाला हेच कळत नाहीये की त्या माणसावर कुठल्या लेव्हलचे संस्कार आहेत. तो ठरवून पण असं बोलू शकत नाही. यात रितेशची चूक नाही. एक अभिनेता म्हणून तो पूर्ण जीव ओतून त्याचं काम करण्याचा प्रामणिक प्रयत्न करतोय. पण, त्याच्या डोळ्यात त्याच्यातला एक गोड माणूस इतका ताबा घेऊन असतो की, आपल्याला अपेक्षित असलेली नजर त्यात दिसत नाही… हे माझ मतं आहे लोकांना कदाचित आवडणार नाही त्याबद्दल क्षमस्व.
-ADV Pallavi vichare.

Bigg Boss Marathi : रितेश देशमुख ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

हेही वाचा : जान्हवीला टाकलं जेलमध्ये! “तुमची जागा बाहेर”, म्हणत रितेश देशमुखने केली मोठी शिक्षा; संतापून म्हणाला, “यापुढे…”

दरम्यान, पल्लवीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खरं आहे रितेश सरांचा तो स्वभावच नाहीये”, “खरंय दादा रागावतो पण ठरवून…”, “खरं आहे ताई… अशी माणसं खूप कमी आहेत. जी प्रत्येकाशी आदराने बोलतात आणि स्वतःवर संयम ठेवून बोलतात आणि रितेश सर तर यात रॉयल माणूस आहे” अशा कमेंट्स या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. रितेशचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय त्याची व जिनिलीयाची जोडी सुद्धा घराघरांत लोकप्रिय आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi anshuman vichare wife pallavi shared post for riteish deshmukh sva 00