‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे प्रसिद्धी झोतात आलेला घनःश्याम दरवडे उर्फ छोटा पुढारी नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच २५ डिसेंबरला घनःश्यामचा वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्ताने घनःश्यामने आपल्या निवासस्थानी टाकळी लोणार इथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेले प्रसिद्ध किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचं किर्तन आयोजित केलं होतं. तसंच घनःश्यामच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला खास ‘किल्लर गर्ल’, ‘टास्क क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी जान्हवी किल्लेकर आपल्या कुटुंबासह उपस्थित राहिली होती. छोट्या पुढारीच्या वाढदिवसाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते. पण, वाढदिवसाच्या दिवशी ‘बिग बॉस मराठी’मधील काही सदस्य हजर राहिले नाहीत. यावर घनःश्यामने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
गैरहजर राहणाऱ्यांपैकी एक म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. या दोघांनी घनःश्याम दरवडेच्या वाढदिवसाआधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये निक्की, अरबाजने छोटा पुढारीच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या गावी येणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. पण, निक्की-अरबाजने शब्द पाळला नाही. यावरून घनःश्यामने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. याशिवाय घनःश्यामच्या वाढदिवसाला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण अनुपस्थित होता. यावरही आता घनःश्यामने नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – Bigg Boss 18: १२व्या आठवड्यात हृतिक रोशनची लाइफ कोच झाली एविक्ट; म्हणाली, “कशिशमुळे मी आज बाहेर…”
‘लेट्सअप’ मराठीशी संवाद साधताना घनःश्याम दरवडे म्हणाला, “२२ तारखेला आम्हाला बॅनर लावायचे होते. तेव्हा सूरज मला स्पष्ट भाषेत म्हणाला, घनःश्याम माझ्या हातात येण्याचं काहीच नाही. माझे भाचे माझे पीआर असतील. त्यांच्याशी तू बोलून घे. त्यांच्याशी बोलल्यानंतर मी येऊ शकतो. ते सगळं झाल्यानंतर त्यांना काही जमलंच नाही. मी म्हटलं, फुल नं फुलाची पाकळी द्यावी. आपण तर सूरज भाऊला पाठिंबा दिला आहे. अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्ताने इथं आल्यामुळे आणि त्याच्या घराचं काम सुरू आहे, तर फुल ना फुलाची पाकळी देऊ या, असं ठरवलं होतं.”
पुढे घनःश्यामला विचारलं, “सूरजने गुलीगत धोका दिला का?” यावर छोटा पुढारी म्हणाला, “नाही, सूरजने गुलीगत धोका नाही दिला. बिचाऱ्याला मी दोष देत नाही. नावं ठेवतं नाही. त्याचं सगळं पीआर लोक बघतात. त्यामुळे सूरज भाऊला आपण बोलू शकतं नाही.” घनःश्यामने याचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, वाढदिवसाला सूरज न आल्याने थोडा भावुक झालो.
हेही वाचा – उर्मिला कोठारे कार अपघाताप्रकरणी चालकाला अटक, अभिनेत्रीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
दरम्यान, घनःश्याम दरवडे ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात घराबाहेर झाला. यावेळी त्याने घराबाहेर होताना म्युच्युअल फंडचा कॉइन सूरज चव्हाला दिला होता.