Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या बरंच चर्चेत आहे. पहिल्या दिवसांपासून यात सहभागी झालेले १६ स्पर्धक एकमेकांशी वाद घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील यांनी घराचा निरोप घेतला आहे. आता घरात एकूण १५ स्पर्धकांमध्ये ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी धडपड सुरू आहे. हा खेळ सुरू होऊन आता तीन आठवडे उलटले आहेत. या सगळ्या खेळाडूंना आपली घरची आठवण येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ने या सगळ्या सदस्यांना आपल्या कुटुंबीयांशी बोलण्याची एक संधी दिली आहे.
‘बिग बॉस’ने घरातील सगळ्या सदस्यांना कन्फेशन रुममध्ये बोलावून आपल्या कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधण्याची संधी दिली होती. यावेळी वर्षा, सूरज, अंकिता, पंढरीनाथ, छोटा पुढारी घन:श्याम या सदस्यांना अश्रू अनावर झाल्याचं नुकत्याच ‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय निक्की अन् अरबाज देखील कन्फेशन रुममधून बाहेर येताच भावुक झाले होते.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : पहिल्यांदाच दिसणार सूरज चव्हाणचं रौद्ररुप! थेट अरबाजशी घेणार पंगा; म्हणाला, “त्याला हाणलं…”
‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य झाले भावुक
‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात सध्या कॅप्टनसी कार्य चालू आहे. या कार्यात निक्की, अरबाज, जान्हवी, निखिल, सूरज आणि योगिता या सात स्पर्धकांमध्ये कॅप्टनसी पदासाठी झुंज सुरू आहे. या टास्कमध्ये पहिल्यांदाच सूरजचं रौद्ररुप पाहायला मिळेल परंतु, निक्की-अरबाज-जान्हवी या त्रिकुटापुढे त्याचा निभाव लागणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे कॅप्टन्सी कार्य पार पडल्यावर घरातल्या सगळ्या सदस्यांना आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधायला मिळणार आहे.
घरच्यांशी फोनवर बोलताना संपूर्ण घर भावुक झालं होतं. अंकिताने या प्रोमोमध्ये मालवणी भाषेत संवाद साधत आपल्या भावना व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळतंय. तर, सूरज चव्हाण आईच्या आठवणीत भावुक झाला होता. नेटकऱ्यांना देखील हा प्रोमो पाहून सूरजची दया आली आहे. आजवर मोठा संघर्ष करून सूरजने रीलस्टार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. वडिलांचं निधन, आई अन् आजीचं एकाच दिवशी जाणं यामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे. टास्कदरम्यान फोनवर बोलताना त्याने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘बिग बॉस मराठी’ने शेअर केलेल्या प्रोमोवर “आम्हाला सूरजला पाहून खूप वाईट वाटतंय”, “सगळा महाराष्ट्र तुला सपोर्ट करतोय सूरज” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून आल्या आहेत. आता या टास्कनंतर घरातलं वातावरण बदलून स्पर्धेत एक नवीन वळण येईल का? हे लवकरच स्पष्ट होईल.