Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan : लहापणीचं आई-वडिलांचं छत्र हरपलं, अर्धवट शिक्षण, घरात बेताची परिस्थिती, जवळच्या लोकांकडून फसवणूक अशा कठीण काळावर मात करत सूरज चव्हाणने आपल्या वैयक्तिक आयुष्यात मोठा टप्पा पार केला आहे. पालक नसल्याने सूरजचा सांभाळ त्याच्या पाच बहिणींनी केला मात्र, आताच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्र या ‘गुलीगत किंग’चा चाहता झाला आहे.
‘बिग बॉस मराठी’चं ( Bigg Boss Marathi ) पाचवं पर्व संपलं असलं तरीही या सगळ्या स्पर्धकांनी घरात बनवलेली नाती बाहेर आल्यावर सुद्धा तेवढ्याच आपुलकीने जपली आहेत. याची प्रचिती प्रेक्षकांना सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल होणाऱ्या एका फोटोमुळे आली आहे.
सूरजच्या घरी पोहोचले ‘हे’ सदस्य
सूरजच्या मोढवे गावी खास दिवाळीनिमित्त ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेले चार सदस्य गेले होते. यापैकी पहिली आहे जान्हवी किल्लेकर. सूरजला शब्द दिल्याप्रमाणे अभिनेत्री खास भाऊबीज साजरी करण्यासाठी त्याच्या गावी गेली होती. यावेळी जान्हवीबरोबर तिचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. याशिवाय कोल्हापूरचा धनंजय पोवार, वैभव चव्हाण आणि परदेसी गर्ल इरिना हे तिघंही सूरजच्या घरी गेले होते.
यावेळी जान्हवी, वैभव, इरिना, डीपी आणि सूरज या पाच जणांनी मिळून सुंदर असा फोटो देखील काढला आहे. हाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय धनंजय पोवारने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत याला ‘यारी’ असं कॅप्शन दिलं आहे.

नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “तुमची दोस्ती लय भारी आहे”, “संपूर्ण टीम बी एकत्र आली पाहिजे होती”, “योगिता, आर्या आणि अंकिताला पण घेऊन या”, “आठवणीमधला बिग बॉस ( Bigg Boss Marathi )”, “तुमची दोस्ती कमाल आहे कोणीही जिंको किंवा हरो सुंदर मैत्री तयार झाली”, “तुम्हा सर्वांचं नातं असंच राहूद्या” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी यावर दिल्या आहेत.