Bigg Boss Marathi Dhananjay Powar : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सर्वत्र तुफान गाजला. आजवरच्या एकाही सीझनला प्रेक्षकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नव्हता. या पर्वातील सदस्य, घरात झालेली भांडणं या सगळ्या गोष्टींची संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चा झाली. यावर्षी कलाकारांसह सोशल मीडिया स्टार्स देखील ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी झाले होते. त्यामुळे या शोचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात वाढला.
‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून ‘ए ग्रुप’ व ‘बी ग्रुप’ असे दोन गट तयार झाले होते. यापैकी ‘ए टीम’मध्ये निक्की-अरबाज होते. तर, बी ग्रुपमध्ये अंकिता, धनंजय, सूरज, पंढरीनाथ ही मंडळी होती. शो संपताना शेवटच्या काही भागांमध्ये निक्की-अरबाजचा रिलेशनशिप ड्रामा नॅशनल टेलिव्हिजनवरच सर्वांनाच पाहायला मिळाला. या दोघांच्या नात्यावर अनेकांनी नाराजी देखील दर्शवली होती. याउलट प्रेक्षकवर्ग सूरजचा साधाभोळा स्वभाव, ‘बी’ ग्रुपच्या कट्ट्यावरचे किस्से याला जास्त पसंती द्यायचा. यासंदर्भात एका चाहत्याने कमेंट केली होती. हीच कमेंट स्क्रीनशॉटसह धनंजय पोवारने ( Dhananjay Powar ) पोस्टच्या स्वरुपात इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये निक्की-अरबाजच्या प्रेमाला दिलेल्या फुटेज संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये नेमकं काय लिहिलंय पाहुयात…
धनंजय पोवारने शेअर केली चाहत्याने लिहिलेली पोस्ट
निक्की-अरबाजच्या फेक नात्यातील खोटे इमोशन्स, फालतू चाळे, अश्लील हरकती यांना अवास्तव फुटेज देण्यापेक्षा नात्यातील खऱ्या प्रेमाच्या, भावनांच्या क्षणांना जरा जास्त फुटेज द्या. BB! तुमचा शो पहिल्यांदाच घराघरांतील लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांनी सर्वाधिक वेळा पाहिला तो याच डीपी, अंकिता, सुरज, पॅडी दादा अशा मराठी मातीतल्या सामान्य आणि खऱ्या स्पर्धकांमुळे! कारण, ही माणसं सर्वांनाच आपल्या घरातली वाटतात. लोक TV कडे डोळे लावून बसतात ते असे खरे क्षण पाहण्यासाठी…
चांगल्या गोष्टी तुम्ही पडद्यावर आणतच नाही. नात्यातील गोडवा दाखवणारा हा क्षण दाखवण्यासाठी तुमच्याकडे एक – दोन मिनिटेही वेळ नव्हता? इतकी घाई? तुम्हाला मात्र निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर दाखवून त्यातून नक्की कोणता संदेश द्यायचा आहे?
धनंजयने ( Dhananjay Powar ) ही पोस्ट शेअर करत यात अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे आणि आर्या जाधव या मंडळींना टॅग केलं आहे. दरम्यान, धनंजय पोवारच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, युट्यूब, इन्स्टाग्रावर कौटुंबिक व विनोदी व्हिडीओ बनवून धनंजय घराघरांत ‘डीपी दादा’ म्हणून लोकप्रिय झाला. ‘बिग बॉस’च्या घरात त्याला चौथ्या क्रमांकावर बाहेर पडावं लागलं. ट्रॉफी जिंकता आली नसली तरीही डीपीला गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.