अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपट २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. पण, चित्रपट प्रदर्शनापूर्वी वाद निर्माण झाला आहे. या वादावर अनुराग कश्यपसह अनेक कलाकारांनी आपलं परखड मत मांडलं. तसंच आता ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने देखील पोस्ट लिहीत आपली भावना व्यक्त केली आहे.
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समाजाला मानवतेचा व सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘फुले’ चित्रपटाची सध्या खूप चर्चा रंगली आहे. हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र वादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून २५ एप्रिल करण्यात आली. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाला तोंड फुटलं. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आरोप करत म्हणाले होते, “‘फुले’ चित्रपटाच्या निर्मात्यांना ट्रेलरमधून वेगळं चित्र दाखवत पुन्हा जातीवाद करायचा आहे. चित्रपट वास्तवाला धरून नसेल तर हा चित्रपट योग्य नाही.” यावरच अभिनेत्री आरती सोळंकीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
आरती सोळंकीने लिहिलं, “मी ब्राह्मण नाही, मी दलित नाही, मी मराठी सुद्धा नाही. माझा जन्म मुंबई मधला, माझं शिक्षण मराठीमधून, माझी कर्मभूमी तीही मराठी रंगभूमी. मला माझा महाराष्ट्र मधल्या प्रत्येक महात्म्यांबद्दल आदर्श, गर्व, अभिमान आहे. मी एक महाराष्ट्रीयन आहे आणि म्हणून ‘फुले’ हा चित्रपट मी नक्की बघणार.”
‘फुले’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील ‘या’ सीनवर आक्षेप
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आनंद दवे म्हणाले होते की, ‘फुले’ चित्रपटाचं आम्ही मनापासून स्वागतचं करतो. असे चित्रपट झाले पाहिजे. पण, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड-शेण फेकताना दिसला आहे. हा प्रकार दाखविण्यास आमचा विरोध नाही. तत्कालीन समाजाच्या हातून अशी काही पातके घडली असतील. परंतु महात्मा जोतीराव फुल्यांना शाळेसाठी मदत, देणगी देणारी लोक, शाळेत शिक्षक म्हणून जाणारे लोक, शाळेच्या पहिल्या तुकडीत सहा पैकी चार विद्यार्थी ब्राह्मण होते. हादेखील चित्रपटात उल्लेख आहे का? आणि उल्लेख असेल तर ते ट्रेलरमध्ये का नाही दाखवले गेले? असा आमचा सवाल आहे. दरम्यान, ‘फुले’ चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी महात्मा फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा राव साकारत आहे.