Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेले सदस्य सध्या एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. तसंच विविध कार्यक्रमांमध्ये या सदस्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करत आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पाहायला मिळालेले सदस्य चर्चेत आहेत. यांचे फोटो, व्हिडीओ सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा उपविजेता अभिजीत सावंतने नुकतीच योगिता चव्हाणची भेट घेतली. अभिजीत पत्नी शिल्पा सावंतसह योगिताच्या घरी गेला होता. या खास भेटीचे फोटो शिल्पा सावंतसह योगिताचा पती सौरभ चौघुलेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या खास भेटीत अजून एक ‘बिग बॉस मराठी’मधील सदस्य होता तो म्हणजे निखिल दामले. ३० ऑक्टोबरला ही खास भेट झाली. सौरभ चौघुलेने फोटो शेअर करत लिहिलं आहे, “प्रेम, हसू आणि आनंद…कालच्या रात्रीबद्दल.”
तसंच शिल्पा सावंतने देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, “जबरदस्त संध्याकाळ…मस्त गप्पा रंगल्या. निखिल दामले, सौरभ चौघुले आणि योगिता चव्हाण तुमचे मी आभारी आहे.”
हेही वाचा – ‘मिर्झापूर : द फिल्म’मध्ये बबलू पंडितची एन्ट्री होणार, IAS अधिकारी म्हणून परतणार?
दरम्यान, अभिजीत सावंतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘बिग बॉस मराठी’नंतर त्याचं पहिलं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच त्याचा टीझर पाहायला मिळाला. भाऊ बहिणीच्या नात्याचा गोडवा अधिक वाढवायला ‘लाडकी बहीण’ हे अभिजीतचं गाणं प्रदर्शित होणार आहे.
तसंच योगिता चव्हाण आणि निखिल दामले ‘बिग बॉस मराठी’नंतर अजून कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये दिसले नाहीत. लवकरच दोघं देखील नव्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळतील, अशी चाहत्यांना आशा आहे. याशिवाय सौरभ चौघुलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आता हिंदी मालिकाविश्वात पाऊल ठेवलं आहे. ‘दंगल’ वाहिनीवरील ‘सफल होगी तेरी आराधना’ मालिकेत सौरभ झळकला आहे. या मालिकेत विलासराव नावाची व्यक्तिरेखा त्याने साकारली आहे.