कलाकार आणि चाहते हे एक आगळंवेगळं नातं आहे. कलाकार हा कायमच चाहत्यांच्या प्रेमाचा, आशीर्वादाचा आणि कौतुकाचा भुकेला असतो. तर चाहतेही अनेकदा आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची वाट पाहत असतात आणि जेव्हा कधी त्यांचे आवडत्या कलाकाराशी भेट होते. तेव्हा त्यांना अगदी भरून येतं. कलाकारांच्या वाट्याला त्यांच्या चाहत्यांचे असे अनेक किस्से येत असतात. असंच काहीसं झालं आहे एका मराठी कलाकाराबरोबर. हा कलाकार म्हणजे उत्कर्ष शिंदे.

‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) या शोमधून उत्कर्ष (Utkarsh Shinde) घराघरांत पोहोचला. उत्कर्षने आजवर आपल्या गाण्यामुळे, अभिनयामुळे आणि खास लेखनशैलीने सर्वांच्याच मनात स्थान निर्माण केलं आहे. याच कलागुणांमुळे त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. याच चाहत्यांचे काही खास क्षण उत्कर्षने शेअर केले आहेत. उत्कर्षने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात एक आजोबा त्यांच्या नातवाचे आणि एक महिला त्यांच्या पुतण्याचे नाव उत्कर्ष ठेवल्याचं सांगत आहेत. हा खास व्हिडीओ शेअर करत उत्कर्षने खास कॅप्शनही लिहिलं आहे.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये उत्कर्षने असं म्हटलं आहे की “कोणी नाव ठेवलेलं आवडेल का? नाही ना… पण जगभरात नाव कमावलं की, रसिकांचं, चाहत्यांचं इतकं प्रेम अनुभवायला मिळतं आणि एकदा का चाहते आपल्याबरोबर असले की, मग हवं ते मिळवता येतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये शूटिंग सुरू असताना एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन आले आणि स्तुती सुमने उधळू लागले. मला तुम्ही खूप आवडता… माझ्या नातवाचं नाव मी तुमच्या नावावरुनच उत्कर्ष असं ठेवलं आहे. तुम्ही त्याला आशीर्वाद द्या. मी ही आनंदाने त्याला जवळ घेत फोटो काढला. दोन शब्द बोलून पुढे निघालो.”

यानंतर त्याने असं म्हटलं आहे की, “पुढे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शूट होतं. लोकेशनवर पोहोचलो आणि हॉस्पिटलमध्ये सेल्फीज सुरू झाल्या नातेवाईक, स्टाफ, नर्सेस आणि काही पेशंट फोटो काढायला आले. त्यात एक ताई सलाईन लावलेला हात घेऊन भेटायला आल्या. सर मला वाटलं नव्हतं कधीतरी तुम्हाला समोर भेटेन; पण आज हॉस्पिटलमध्ये माझी इच्छा पूर्ण झाली. खूप आनंद झाला. मी माझ्या मुलाचं नावं तुमच्या नावावरूनच उत्कर्ष ठेवलं आहे. माझे पुतणे आहेत, त्यापैकी एकाचं नाव हर्ष ठेवलं आणि आता आदर्श यायचा बाकी आहे.”

यापुढे उत्कर्षने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “किती निर्मळ मनाने प्रेम करतात. कधी कधी हे बघून मी अवाक होतो. भारतभर इतकं प्रेम लाभतं, इतका आशीर्वाद मिळतो, ज्याचं काही माप नाही. मी या चाहत्यांच्या ऋणात असंच आनंदित राहू इच्छितो. रोज येणार मेसेज, रोज भेटायला आणि सेल्फी घ्यायला येणारे, मायेने नजर काढणारे चाहते प्रेमाची वेगळीच जाणीव करून देतात. “तू असाच पुढे मेहनत करत रहा आम्ही तुझ्याबरोबर आहोत.” असं म्हणतात. जेव्हा जनताच बरोबर आहे मग काय उत्कर्ष तर होणारच.”

दरम्यान, उत्कर्षने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याचं कामेंट्समध्ये कौतुक केलं आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी “हीच खरी कमाई”, “खुप गोड”, “हे क्षण जपून ठेव”, “तुझ्यावर कायम असाच आशीर्वाद असुदे” अशा अनेक कमेंट्सद्वारे उत्कर्षचे कौतुक केलं आहे.