Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाचे आतापर्यंत एकूण पाच सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या शोच्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ‘बिग बॉस’मुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले तर, काही जणांच्या करिअरला या शोमुळे एक वेगळी कलाटणी मिळाली. याशिवाय, काही इंडस्ट्रीत सक्रिय नसणारे स्पर्धक सुद्धा या शोमध्ये सहभागी झाल्यावर महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाले. यापैकीच एक म्हणजे मीनल शाह. ‘रोडीज’सारखा शो केल्यावर अभिनेत्री मीनल शाहने ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात एन्ट्री घेतली होती.
‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनची मीनल फायनलिस्ट ठरली होती. घरात सर्वांबरोबर समान वागणूक, टास्कमधली चपळता आणि फेअर खेळ यामुळे मीनलला घराघरांत लोकप्रियता मिळाली. अंतिम फेरीत तिने टॉप-५ पर्यंत मजल मारली होती. ‘बिग बॉस’ संपल्यावर अभिनेत्रीने अनेक छोटे-मोठे शो करत आपली डान्सची आवड सुद्धा जोपासली. आता मीनल वैयक्तिक आयुष्यातल्या एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.
मीनलने बॉयफ्रेंडशी लग्नगाठ बांधत गोव्यातील घरी गुपचूप आपला विवाहसोहळा उरकला आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत मीनलने तिच्या सगळ्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्री लिहिते, “आय लव्ह यू तथागत… आमच्या प्रियजनांकडून मिळालेलं प्रेम आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. मला खूप काही सांगायचंय पण, माझ्या भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.” या सुंदर कॅप्शनसह मीनलने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
मीनल शाहने लग्नसोहळ्यात मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळालं. नारिंगी रंगाची सुंदर साडी, हातात हिरव्या बांगड्यांच चुडा, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर या लूकमध्ये मीनल खूपच सुंदर दिसत होती. मीनलच्या लग्नाला ‘बिग बॉस शो’मधली तिची जिवलग मैत्रीण सोनाली पाटील सुद्धा उपस्थित होती.
सध्या संपूर्ण कलाविश्वातून मीनलवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. मेघा धाडे, आशिष पाटील, सुमीत पुसावळे, दिव्या अग्रवाल, नैना सिंह यांनी कमेंट्स करत मीनलला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.