‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने निभावलेलं पात्र घराघरात पोहोचलं आहे. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवं वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच ‘रमा राघव’ मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.
रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवं वादळ आणणारा ठरणार आहे. विक्रम या पात्राचा रमा राघवच्या आयुष्यात प्रवेश झाला आहे. अभिनेता अद्वैत दादरकरने विक्रमची भूमिका साकारली आहे. त्यानंतर आता ‘रमा राघव’ मालिकेत ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री वीणा जगतापची एन्ट्री होणार आहे.
हेही वाचा – Video: ‘नाच गं घुमा’ गाण्यावर पूजा सावंतचा बहिणीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
रमा राघवचा सुरू झालेला वनवास आणि त्यात विक्रम या असुराचा प्रवेश या पार्श्वभूमीवर वीणाचं एक नवं पात्र मालिकेत प्रवेश करत आहे. अद्वैत दादरकर पाठोपाठ वीणाचा ‘रमा राघव’ मालिकेतील प्रवेश प्रेक्षकांसाठी सुखद धक्का आहे. दरम्यान, ‘कलर्स मराठी’वरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतून वीणाने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’मुळे वीणा अधिक प्रसिद्ध झोतात आली. आता पुन्हा एकदा वीणा ‘कलर्स मराठी’च्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
हेही वाचा – अभिनेता प्रसाद खांडेकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला दिली पाणीपुरी पार्टी
वीणाची नक्की कोणती भूमिका आहे? रमा राघवच्या आयुष्यावर त्याचा काय प्रभाव पडणार? हे गुलदस्त्यात असून याची उत्तरं ‘रमा राघव’मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री साडे नऊ वाजता ‘कलर्स मराठी’वर मिळणार आहेत.
हेही वाचा – Video: सिद्धार्थ जाधव व सुरेश रैनाची झाली ग्रेटभेट, क्रिकेटरने अभिनेत्याचं केलं कौतुक; व्हिडीओ व्हायरल
वीणाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘बिग बॉस मराठी’ व्यतिरिक्त ती ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती. याशिवाय ती ‘योग योगेश्वर जय शंकर’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.