‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेली कोकण कन्या अंकिता प्रभू वालावलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबाबत पोस्ट करत असते. तसंच आजूबाजूच्या घडामोडींवर परखड भाष्य करत असते. लवकरच अंकिता बोहल्यावर चढणार आहे. त्यामुळे सध्या ती जोरदार लग्नाची तयारी करताना दिसत असून अनेकांना निमंत्रण देताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अंकिताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लग्नाचं निमंत्रण दिलं. यासाठी अंकिता होणारा पती कुणाल भगतसह राज ठाकरेंच्या निवासस्थानी ‘शिवतीर्था’वर गेली होती. त्यानंतर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी ती अक्कलकोटला गेली होती. याचे नुकतेच तिने फोटो शेअर केले आहेत.
अंकिता वालावलकरने अक्कलकोटचे फोटो शेअर करत एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने लिहिलं, “काल स्वामींचं दर्शन घेऊन आलो…मनात खूप गोष्टी होत्या…सतत वाटायचं की खोटं वागणाऱ्यांबरोबर चांगलं का होतं? आपण खरं वागून चुकीचे का वाटतो? आपल्याला मुद्दाम चुकीचं का दाखवलं गेलं? पण अक्कलकोट हे एक अस स्थान आहे जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात…एक कायम लक्षात ठेवा ‘कर्माच्या हिशोबात उशीर होतो, चूक होतं नाही, बाकी तो बघता, तेचो लक्ष आसा’ कुणाल तू माझ्या कर्माचं एक फळ.”
अंकिता भगतच्या या पोस्टवर तिच्या बऱ्याच चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण एका नेटकऱ्याने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावर अंकिताने त्याला चांगलंच सुनावलं. तो नेटकरी म्हणाला की, तुला तशी पण गरजचं होती ‘अक्कल’कोटला जायची. यावर अंकिता प्रत्युत्तर देत म्हणाली, “तुमच्यातल्या नकारात्मकतेला स्वामी सकारात्मकतेने बदलून तुमच्या कुटुंबाचं भलं करू देत. श्री स्वामी समर्थ.”
दरम्यान, अंकिता वालावलकरने लग्नाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पण माहितीनुसार, अंकिता फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे. अंकिताचा होणारा पती कुणाल संगीतकार आहे. बऱ्याच चित्रपटातील गाणी आणि मालिकांचं शीर्षकगीत त्याने संगीतबद्ध केलं आहे.