Bigg Boss Marathi Fame Ghanshyam Darode : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरवडे घराघरांत लोकप्रिय झाला. शो सुरू असताना त्याचं आणि निक्की तांबोळीचं भावा-बहिणीचं नातं सर्वत्र चर्चेत राहिलं होतं. कारण, घन:श्याम एलिमिनेट होईपर्यंत या दोघांचं जेवढं बॉण्डिंग महाराष्ट्राने पाहिलं, अगदी या दोघांमध्ये तेवढेच वाद सुद्धा ‘बिग बॉस’च्या घरात झाले होते. एकंदर निक्की आणि घन:श्यामची मैत्री घरात चर्चेत राहिली होती. आता शो संपल्यावर हे सगळे स्पर्धक विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहेत.
‘छोटा पुढारी’ शो संपल्यावर पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला. पोस्ट, व्हिडीओ शेअर करत तो सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडत असतो. ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होताना स्पर्धकांबरोबर करार केला जातो यानंतर त्यांचं मानधन देखील ठरवलं जातं. या पैशांतून घन:श्यामने काय केलं याचा खुलासा त्याने युट्यूब व्हिडीओ शेअर करत केला आहे.
घन:श्यामने दिली आनंदाची बातमी
छोटा पुढारी या व्हिडीओमध्ये म्हणतो, “सगळेजण मला प्रश्न विचारायचे, घन:श्याम तुम्ही बिग बॉसच्या ( Bigg Boss Marathi ) पैशांतून काय केलं? कुणी दागदागिने केले, कुणी त्या पैशांची वेगळी गुंतवणूक केली. आता अनेकांना प्रश्न होता मी त्या पैशांचं काय केलं? आज मी सर्वांना याबाबतची आनंदाची बातमी सांगतो. आपण त्या पैशांची जागा घेतलीये.”
घन:श्यामच्या आई लेकाचं कौतुक करत म्हणाल्या, “मला खूपच छान वाटतंय. नवीन जागा घेऊन आम्ही ती त्याच्याच नावावर केली. तो मला म्हणाला होता आई, तुझ्या नावावर ही जागा घेऊ पण, मी त्याला सांगितलं होतं नाही. ही तुझी कमाई आहे त्यामुळे तुझ्याच नावावर घ्यायची. आम्हाला वाटलं नव्हतं तो एवढे दिवस मोबाइलशिवाय वगैरे राहील… पण, तो राहिला त्यामुळे ही जागा त्याचीच आहे.”
हेही वाचा : Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
घन:श्याम पुढे म्हणाला, “माझी आई, कुटुंबीय आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी ही जागा खरेदी करू शकलो. विशेष म्हणजे माझ्या आईला सर्वात जास्त आनंद झालाय. आज माझं नाही… माझ्या आई आणि अण्णांचं स्वप्न पूर्ण झालंय. श्रीगोंदा येथे तालुक्याच्या ठिकाणी आम्ही ही जागा खरेदी केली आहे.”