Bigg Boss Marathi Fame Chota Pudhari Aka Ghanshyam Darode : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे छोटा पुढारी घन:श्याम घराघरांत लोकप्रिय झाला. शोमध्ये असताना तो पूर्णवेळ निक्की-अरबाजच्या ‘ए’ टीमला सपोर्ट करताना दिसला. घन:श्यामने ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीला आपली बहीण मानलं होतं. त्यामुळे तो लाडाने तिला ‘निकू ताई’ असं म्हणतो. ‘बिग बॉस’चा शो संपल्यावर देखील छोटा पुढारी निक्की-अरबाजला त्यांच्या मुंबईतील घरी खास भेटायला गेला होता. यादरम्यान, या तिघांनी मिळून एक व्हिडीओ बनवला होता.
घन:श्यामने मुंबईत आल्यावर जान्हवी किल्लेकर तसेच निक्की-अरबाजची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाचं आमंत्रण दिलं होतं. छोटा पुढारीचा वाढदिवस २५ डिसेंबरला असतो त्यामुळे, साधारण महिनाभर आधीच त्याने आपल्या लाडक्या निकू ताईला वाढदिवसाचं आमंत्रण दिलं होतं. निक्कीने सुद्धा व्हिडीओमध्ये, “मी घन:श्यामच्या घरी त्याच्या वाढदिवसाला नक्की जाणार आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेणार” असं म्हटलं होतं. अरबाज ( Bigg Boss Marathi ) सुद्धा यावेळी उपस्थित होता.
नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
छोटा पुढारीने याच व्हिडीओमध्ये अरबाजचा चुकून उल्लेख ‘दाजी’ ( बहिणीचा नवरा ) असा केला होता. त्यामुळे हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होऊन, निक्की-अरबाज छोटा पुढारीच्या घरी त्याच्या वाढदिवसाला जाणार की नाही? याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते.
अखेर वाढदिवसाच्या दिवशी फक्त जान्हवी किल्लेकर आणि किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांनी घन:श्यामच्या घरी उपस्थिती लावली होती. त्याच्या वाढदिवसाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी, “निक्की-अरबाज येणार होते ना? ते का नाही आले?” असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावर शेवटी, छोटा पुढारीने एक व्हिडीओ शेअर करत निक्की-अरबाजच्या अनुपस्थितीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
छोटा पुढारीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निक्की-अरबाज स्पष्टपणे “आम्ही तुझ्या घरी येऊ” असं म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत घन:श्याम लिहितो, “आज समजलं खरा शब्द कोणाचा… कोणी शब्द खरा ठरवला, कोण आले आणि कोण नाही आले… आपलं कोण आणि परकं कोण तुम्ही ठरवा आता…”
घन:श्यामची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी मात्र त्याला चांगलंच सुनावलं आहे. “निक्की-अरबाजने Bigg Boss Marathi च्या घरात तुझा फक्त वापर केला”, “तुला फक्त ते आता लक्षात येतंय, तू आधीच चांगल्या लोकांबरोबर गेम खेळायचा होतास” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, आता या छोटा पुढारीच्या वाढदिवसाला अनुपस्थित राहिल्याच्या नाराजी प्रकरणावर निक्की काय प्रतिक्रिया देणार की मौन बाळगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.