Dhananjay Powar & Santosh Juvekar : मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेक. यापैकी रायाजींची भूमिका साकारणारा अभिनेता संतोष जुवेकरला गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

एका मुलाखतीत संतोष जुवेकरने, ‘छावा’ सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाशी मी सेटवर बोललो नाही असं वक्तव्य केलं होतं. यानंतर त्याला सर्वांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. अनेकांनी संतोष जुवेकरचे जुने व्हिडीओ, त्याने यापूर्वी केलेल्या भूमिकांचे फोटो शोधून काढत त्याच्यावर सोशल मीडियावर टिकेचा भडिमार सुरू केला.

आता मात्र, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेल्या डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवारने अभिनेत्याच्या समर्थनात पोस्ट शेअर करत, त्याला ट्रोल न करण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं आहे. तसेच धनंजयने त्याच्या पोस्टमध्ये संतोषला चुकीचं समजू नका असंही म्हटलं आहे.

“संतोषला मी खूप वर्षांपासून ओळखतो. तो मनाने खूप निखळ आहे. सध्या ट्रोल होतोय पण, तुम्ही त्याला चुकीचं समजू नका. तो खूप साध्या विचारांचा आहे. मनाने पूर्णपणे मराठी संस्कृती जपणारा आहे… आय होप तुम्ही सगळं हे बंद कराल.” अशी पोस्ट शेअर करत डीपीने संतोषला पाठिंबा दिला आहे. या पोस्टसह डीपीने संतोषबरोबर एक खास फोटो देखील शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल स्वत: संतोषने आपली प्रतिक्रिया दिली होती. मला जे बोलायचं होतं ते चुकीच्या पद्धतीने पोहोचलं. अक्षय खन्ना मोठा अभिनेता आहे पण, आम्ही स्ट्रगलर्स आहोत त्यामुळे आम्ही मुलाखती देतो. त्या चित्रपटाचा भाग असणं ही खरंच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही असं संतोष आपली बाजू स्पष्ट करत म्हणाला होता.

‘छावा’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये विकी कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह, दिव्या दत्ता, डायना पेंटी, प्रदीप रावत, नील भूपालम, संतोष जुवेकर असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेकिंग कमाई करत आतापर्यंत ५८५ कोटींचा गल्ला जमावला आहे.