Nikki Tamboli Video Viral : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे मराठमोळी निक्की तांबोळी घराघरांत पोहोचली. निक्कीने काही दाक्षिणात्य चित्रपटही केले आहेत. आता ती ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये निक्की ढसाढसा रडताना दिसत आहे, त्यामुळे निक्कीला नेमकं झालंय तरी काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसते. “मागील तीन वर्षांत मी हिट रिअॅलिटी शो दिले आहेत, पण तरीही मी खूश नाहीये. मी आनंद शोधतेय,” असं निक्की रडत रडत म्हणते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या डोळ्यांतही पाणी येतं. त्यानंतर शेफ रणवीर ब्रार व फराह खान निक्कीशी बोलताना दिसतात.

निक्कीला ती काय बनवतेय, असं ते विचारतात. त्याचं निक्की उत्तर देते. यावेळी निक्की गोंधळलेली दिसते. चिप्स कुठे आहेत, असं रणवीर तिला विचारतात. त्यावर ती बनवू शकली नाही असं उत्तर देते. हे ऐकून फराह खान व विकास खन्ना यांना धक्का बसतो.

पाहा व्हिडीओ –

पुढे निक्की रडत म्हणते, “मी खूप मेहनत करतेय, मला शो मिळत आहेत, पण मी खूश नाहीये. कधी कधी मला वाटतं की मी या सगळ्या गोष्टींसाठी पात्र नाही.” निक्कीचं बोलणं संपल्यावर हा प्रोमो संपतो. निक्की नेमकी कशामुळे रडते, काय घडलंय, ते एपिसोड प्रसारित झाल्यावरच कळेल.

निकी तांबोळीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. २०१९ मध्ये, तिने ‘चिकाती गडिलो चिथाकोटुडू’ या तेलुगू हॉरर कॉमेडी चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘कांचना ३’ या ॲक्शन हॉरर चित्रपटातून तमिळमध्ये पदार्पण केले होते. तिचा तिसरा चित्रपट ‘थिप्पारा मीसम’ होता.

निक्की २०२० मध्ये बिग बॉस १४ या हिंदी रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. त्यानंतर तिने यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात भाग घेतला. मराठीतही ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आता ती पंजाबी चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निक्कीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या बिग बॉस मराठी फेम अरबाज पटेलला डेट करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame nikki tamboli cried usha nadkarni emotional celebrity masterchef video viral hrc