टेलिव्हिजनवरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’मध्ये अनेक नाती तयार होतात. मग ते बहीण-भावाचं असो, मित्र-मैत्रिणीचं असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असो. ‘बिग बॉस’मध्ये ही नाती नेहमी तयार होताना पाहायला मिळतात. पण ‘बिग बॉस’नंतर ही नाती कायम टिकतात असं १०० टक्के नाही. अनेक नाती मोडल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. पण काही नाती ही आयुष्यभरासाठी जोडली जातात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सई लोकूर आणि मेघा धाडे यांची मैत्री.
‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात सई लोकूर आणि मेघा धाडे झळकल्या होत्या. या पर्वातच दोघींची घनिष्ट मैत्री झाली; जी घराबाहेर देखील पाहायला मिळत आहे. या पर्वात दोघी टॉप-४मध्ये होत्या. यामधील मेघाने ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व जिंकलं आणि सई चौथ्या स्थानावरून बाहेर पडली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात झालेल्या मैत्रिणी सध्या एकमेकांबरोबर धमाल-मस्ती करताना दिसत आहेत.
नुकताच सई लोकूरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. “या वेड्या मुलीबरोबर मजेशीर आणि अविस्मरणीय दिवस”, असं कॅप्शन लिहत सईने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सई मेघाबरोबर धमाल-मस्ती करताना पाहायला मिळत आहे. दोघी पाण्यात मजा करत आहेत. हा क्षण दोघी मस्त जगताना दिसत आहेत. दोघींचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
सई आणि मेघाचा व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तुम्हा दोघींना खूप वर्षांनी एकत्र बघितलं…बिग बॉसची आठवण झाली.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, आवडती जोडी. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “माझ्या लाडक्या मैत्रिणी.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं की, तुम्हा दोघींना बघून आनंद झाला…तुमची मैत्री शब्दांचा पलीकडची आहे.
दरम्यान, सई लोकूर आणि मेघा धाडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सई सध्या तिचं वैवाहिक जीवनात व्यग्र आहे. गेल्या वर्षी सई आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला; जिचं नाव ताशी असं आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्ताने सईने तिच्या लेकीची पहिली झलक दाखवली. दुसऱ्याबाजूला मेघा बऱ्याच वर्षांनी टेलिव्हिजनवर परतली आहे. ‘झी मराठी’वर नुकतीच सुरू झालेली ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत मेघा खलनायिकेच्या भूमिकेत झळकली आहे.