‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकलेली योगिता चव्हाण नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावरील ट्रेंड होणाऱ्या गाण्यांवर ती जबरदस्त डान्स करत असते. त्यामुळे आता तिच्या डान्सचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. नुकताच योगिताने आणखीन एक डान्स व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा एक्सप्रेशनने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंतरा म्हणजे अभिनेत्री योगिता चव्हाण ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धी झोतात आली. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात योगिता चव्हाण झळकली होती. अभिनेता सौरभ चौघुलेबरोबर लग्न केल्यानंतर सात महिन्यांनी योगिता ‘बिग बॉस मराठी’मध्ये पाहायला मिळाली. पण या वादग्रस्त शोमध्ये तिचा जास्त काळ टिकाव लागला नाही. काही दिवसांत योगिता घराबाहेर झाली. परंतु, ‘बिग बॉस’मधून बाहेर झाल्यापासून तिच्या डान्स कौशल्याची चर्चा नेहमी रंगली असते. योगिताने ‘बिग बॉस’मध्ये जबरदस्त डान्स केला असता तर ती जास्त काळ टिकली असती, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया तिच्या डान्स व्हिडीओवर उमटल्या आहेत.
नुकताच योगिताने सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ‘उई अम्मा’ गाण्यावर डान्स केला आहे. बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनची १९ वर्षांची मुलगी राशा थडानीच्या ‘उई अम्मा’ गाण्यावर योगिताने आपल्या एक्सप्रेशनने पुन्हा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होतं आहे.
योगिता चव्हाणचा हा डान्स पाहून बऱ्याच कलाकार मंडळींसह चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे, चिन्मयी साळवी, संचिता कुलकर्णी या कलाकारांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर ‘कडक’, ‘मस्त’, ‘डान्स स्टेप आणि एक्सप्रेशनने आग लावली’, ‘खूप छान’, ‘ऑरिजनल गाण्यापेक्षा खूप भारी आहे’, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, राशा थडानीचं ‘उई उम्मा’ गाणं ४ जानेवारीला प्रदर्शित झालं होतं. मधुबंती बागने हे गाणं गायलं असून अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केलं आहे. तर अमिताभ भट्टाचार्य गीतकार आहेत. या गाण्यातील जबरदस्त डान्समुळे राशा चांगलीच भाव खाऊन गेली. तसंच या गाण्यामुळे राशा खूप चर्चेत आली, तिच्या डान्सचं आणि एक्सप्रेशनचं खूप कौतुक झालं.