प्रसिद्धी, फेम काही कलाकार मंडळींनी अगदी कमी वयामध्ये अनुभवायला मिळते. काहींना कमी वयात मिळालेली प्रसिद्धी टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पण प्रसिद्धीच्या झोतात असताना कलाकारांबाबत अनेक चर्चा रंगतात. असंच काहीसं अभिनेता प्रसाद जवादेच्या बाबतीतही घडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसेच त्याला २०व्या वर्षात प्रसिद्धी मिळाल्यानंतर काय घडलं? हेदेखील प्रसादने सांगितलं.
“तुझ्या वागण्याबाबत कलाक्षेत्रात बरीच चर्चा रंगली. यामागचं नेमकं कारण काय होतं?” असा प्रश्न ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसादला विचारण्यात आला. यावेळी प्रसादने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं. तो म्हणाला, “चुकीच्या वेळी मिळालेली प्रसिद्धी, चुकीच्या वयात मिळालेली प्रसिद्धी हे त्यामागचं कारण आहे. २०व्या वर्षातच मला प्रसिद्धी मिळाली”.
“तेव्हा अंगात मस्ती होती. मला सगळं येतं म्हणजे मी खूप मोठा माणूस आहे असं मला वाटायचं. पण सत्य परिस्थितीमध्ये वेगळंच चित्र आहे. ‘नटसम्राट’ बघून आल्यानंतरही मी मुर्खासारखाच वागत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. मी काम चांगलं करायचो. पण सेटवर कट म्हटलं की, मी माझ्या जगातच असायचो”.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील जेठालालकडे खरंच आलिशान बंगला, महागड्या गाड्या आहेत का? अभिनेता म्हणतो, “मुंबईमध्ये…”
“माझ्या जगात वावरत असताना मी चुकून लोकांची मनं दुखावली असतील. पण लोक या छोट्या-छोट्या गोष्टी खूप लक्षात ठेवतात. मी खूप वेगळा वागतो, गर्विष्ठ आहे असं मला जे लोक ओळखत नाहीत त्यांना वाटू शकतं. म्हणून मी सध्या हसरा चेहरा ठेवतो”. शिवाय प्रसिद्धी मिळणं जेव्हा अचानक बंद होतं तेव्हा खूप त्रास होतो असंही प्रसादने यावेळी सांगितलं.