Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा देखील दणक्यात सुरू झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला. निर्णय क्षमतेच्या आधारावर आणि खेळामधील सहभाग यावरून घरातील सदस्याला दोन इतर सदस्यांना नॉमिनेट करायचे होते. या नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या सात सदस्यांना घरातल्या इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं. त्यामुळे आता सहाव्या आठवड्यात या सात सदस्यांपैकी कोण ‘बिग बॉस मराठी’ बाहेर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दुसऱ्या बाजूला ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरू झाल्यापासून हा कार्यक्रम स्क्रिप्टेड असतो. जे काही ‘बिग बॉस’च्या घरात घडतं ते ठरवून केलं जातं, असं म्हटलं जात आहे. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकलेल्या स्पर्धकाने देखील कार्यक्रम स्क्रिप्टेड असल्याचं मान्य केलं आहे.
हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाणार का? गौतमी पाटीलने दोन शब्दात दिलं उत्तर, सूरज चव्हाणला शुभेच्छा देत म्हणाली…
लोकप्रिय गायक त्यागराज खांडिलकरने ‘बिग बॉस मराठी’ संदर्भात खुलासा केला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात त्यागराज खाडिलकर झळकला होता. या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून त्यागराजची एन्ट्री झाली होती. पण त्यागराज जास्त काळ या कार्यक्रमात टिकला नाही. अवघ्या १५-१६ दिवसांनी तो ‘बिग बॉस’मधून बाहेर झाला. याच ‘बिग बॉस मराठी’च्या स्पर्धकाने कार्यक्रम स्क्रिप्टेड असून याचा विजेता ठरलेला असतो, असं वक्तव्य केलं आहे.
त्यागराज खाडिलकर नेमकं काय म्हणाला?
‘बातों बातों में’ या युट्यूब चॅनलवर अलीकडेच त्यागराज खाडिलकरने मुलाखत दिली. यावेळी त्याने रिअॅलिटी शोसंदर्भात अनेक खुलासे केले. रिअॅलिटी शोमध्ये सर्व काही ठरलेलं असतं, असं त्यागराजने सांगितलं. तेव्हाच कांचन अधिकारी यांनी विचारलं की, ‘बिग बॉस’मध्ये पण असं काही होतं का? तर त्यागराज म्हणाला, ” हो. तशाच प्रकारे होतं.”
त्यानंतर त्यागराजला विचारलं, “मग जे काही आतमधलं बोलणं चालतं हे ठरवलेलं असतं?” यावर त्यागराज म्हणाला, “हो, ठरवलेलं आणि मुख्य म्हणजे त्यांना हवं तसं एडिट केलेलं असतं. २४ तास कॅमेरे चालू आहेत आणि एपिसोड तासाभराचा आहे. तर मग एक तासाच्या मध्ये काय दाखवायचं? कोणाच्या बाजूने दाखवायचं? हे ठरवलं जातं. एक ‘ए’ टीम असते आणि दुसरी ‘बी’ टीम. यामधील कोणत्या टीमच्या बाजूने दाखवायचं हे ठरलेलं असतं. महत्त्वाचं म्हणजे विजेता हा आधीच ठरलेला असतो. व्होटिंग, अमुक-तमुक वगैरे याचा काही फरक पडत नाही.”