Bigg Boss Marathi Jahnavi Killekar : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. घरात दहाव्या आठवड्याला सुरुवात झाली असून, येत्या ६ ऑक्टोबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी घरात एक नवीन ड्रामा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेवटच्या आठवड्यात ‘बिग बॉस’ने घरातील स्पर्धकांना एकमेकांची किंमत ठरवण्याचा एक नवीन टास्क दिला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात आता शेवटच्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सदस्यांना आपली किंमत ठरवायची आहे. ‘बिग बॉस’कडून या टास्कसाठी घरात ६ लाख, ४ लाख, ३ लाख, २ लाख, १ लाख आणि ४० हजार अशी रक्कम लिहिलेल्या पाट्या पाठवण्यात आल्या आहेत. या पाट्या सर्वानुमते चर्चा करून सदस्यांनी एकमेकांना द्यायच्या आहेत आणि एकमेकांची रक्कम ठरवायची आहे असं या प्रोमोमधून स्पष्ट होत आहे.
जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरात संतापली
‘बिग बॉस मराठी’च्या शेवटच्या आठवड्यात सदस्य एकमेकांची किती किंमत ठरवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रोमोमधून समोर आलेल्या माहितीनुसार, सूरज ( ६ लाख ), वर्षा उसगांवकर ( ४ लाख ), अभिजीत ( ३ लाख ), अंकिता ( २ लाख ), धनंजय ( १ लाख ) या किंमतीच्या पाट्या सदस्यांनी आपल्या गळ्यात घातल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये ४० हजार म्हणजेच सर्वात कमी किंमतीची पाटी जान्हवीला द्यायचं असं बहुमताने ठरतं आणि निक्की अभिजीतला प्रश्न विचारत म्हणते, “तू जान्हवीला ४० हजार देणारेस?” यावर अभिजीत माझ्याकडे पर्याय नसल्याचं निक्कीला सांगतो. यानंतर जान्हवी चांगलीच भडकते.
हेही वाचा : Bigg Boss Marathi- “रसिक मायबाप प्रेक्षकांनी…”, घराबाहेर आल्यावर पंढरीनाथ कांबळेची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “दादा Unfair…”
जान्हवी प्रचंड संतापते आणि समोर ठेवलेली ४० हजारांची पाटी ती फाडून टाकते आणि म्हणते, “या घरात माझी ४० हजार ही किंमत नाहीये आणि मी ही पाटी अजिबात स्वीकारणार नाहीये.” अभिनेत्रीला अश्रू अनावर झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता घरात कोणत्या सदस्याला किती रक्कम मिळणार हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. सध्या घरात धनंजय, अंकिता, निक्की, अभिजीत, सूरज, वर्षा आणि जान्हवी असे सात सदस्य आहेत. आता या सात जणांपैकी टॉप – ५ मध्ये कोण एन्ट्री घेणार हे येत्या काही भागांमध्ये स्पष्ट होणार आहे.