छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या या कार्यक्रमाचे चौथे पर्व सुरु आहे. या पर्वातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. नुकतंच बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमात अभिनेता जितेंद्र जोशीने उपस्थिती दर्शवली. यावेळी त्याने बिग बॉसच्या कलाकारांचे कौतुक केले. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
अभिनेता जितेंद्र जोशी हा सध्या त्याच्या गोदावरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या ११ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जितेंद्र जोशी हा बिग बॉसमध्ये सहभागी झाला होता. त्याचा एक व्हिडीओ कलर्स मराठीने शेअर केला आहे. या व्हिडीओत जितेंद्र जोशी हा बिग बॉसच्या सदस्यांचे कौतुक करत आहे. जितू बिग बॉसचा खूप मोठा चाहता आहे. त्याने सर्व पर्व पाहिले आहेत, असे महेश मांजरेकरांनी यावेळी म्हटलं. त्यापुढे महेश मांजरेकरांनी जितेंद्र जोशीही बिग बॉसच्या घरात येणार आहे, असे सांगितले. यामुळे बिग बॉसच्या घरातील सर्वजण थक्क झाले.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली
यावेळी जितेंद्र जोशी म्हणाला, “मला फार भारी वाटतंय. हा टास्क फार अवघड आहे. तुम्ही हे कसं करताय. मी खूप घाबरलो आहे. तुमच्याबरोबर खेळायचं फारच अवघडं जाणार आहे. कोणत्या ग्रुपमध्ये जायचं हे पण कळत नाही. यातील प्रत्येक माणूस जेव्हा इमोशनल होतो ना तेव्हा मला फारच भरुन येतं. अपूर्वा खूप स्ट्राँग आहे, ती फार छान खेळते. तू खूप छान गातेस आणि अक्षयबरोबर मजा मस्ती करताना आम्हाला एक वेगळी अपूर्वा बघायला मिळते.
अपूर्वा आणि तेजस्विनीची जोडी खोटी वाटत नाही. प्रसाद हे वेगळे रसायन आहे. प्रसाद, अपूर्वा आणि अक्षय हे तिघे जर शेवटपर्यंत राहिले तर एक वेगळीच गंमत आपल्याला पाहायला मिळेल, असं मला वाटतं. ते तिघेही फार इमोशनल आहेत. मी आत वैगरे काहीही येत नाही”, असे जितेंद्र जोशीने स्पष्टीकरण दिले.
आणखी वाचा : “त्यावेळी वीणाने माझ्यावर हल्ला करण्यापासून…” ‘बिग बॉस’ फेम पराग कान्हेरेने सांगितला ‘तो’ किस्सा
“मी एका कुटुंबाची गोष्ट घेऊन येतोय. पण तुम्ही तुमच्या कुटुंबापासून लांब कसे काय राहताय मला माहिती नाही. हे फारच कठीण आहे. तुम्ही आतल्या आत जे काही कुटुंब बनवलं आहे ते फारच विलक्षण आहे. तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही जे रडता, इमोशनल होता ते फारच कमाल आहे. जे बॉन्डिंग तयार होतंय ते विलक्षण आहे. तुमच्या टास्कमध्ये भांडण, वाद हे होणारच आहे. पण हे सर्व करताना आणि तुम्हाला बघताना इतकं सुंदर वाटतं आहे.
मी तुम्हाला रडवतोय मला तुम्हाला रडवायचं नाही. तुम्ही सर्व फार भारी आहात. पण या एका गोष्टीसाठी मला एकदा तरी आत यायचं आहे. मी तेव्हा तुमच्यासाठी काही तरी भेटवस्तू नक्की घेऊन येईल. ही जी माणसं आतमध्ये जाणे, तिथे राहणं आणि टास्क खेळणं हे फारच कठीण आहे. टास्कमध्ये त्यांनाही लागतं, दुखतं, खुपतं. या सर्वांवर माया धरा, प्रेम करा”, असे जितेंद्र जोशी म्हणाला. सध्या जितेंद्र जोशीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.