Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar: ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा होस्ट तर बदलला आहेच, पण या सीझनमध्ये शोमध्ये बरेच मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. यंदा ‘बिग बॉस मराठी’चे (Bigg Boss Marathi 5) सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश विलासराव देशमुख करत आहे. नुकताच या शोचा ग्रँड प्रिमियर दणक्यात पार पडला. दरवेळी प्रमाणे यंदाही १६ स्पर्धकांची एन्ट्री या घरात झाली आहे. यात मालवणची ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रभू-वालावलकरदेखील आहे. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या अंकिताने तिच्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.
अंकिताने ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं घरी सांगितलं तेव्हा तिच्या आईला एकंदरीतच तिची काळजी वाटली. याबद्दल अंकिता म्हणाली,”तू घरात कशी काम करशील? भांडी घासशील?” असे आईचे प्रश्न सुरू झाले. बाबांना कळलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया विचित्र होती. ते थेट म्हणाले,”तू घरी परत कधी येणार?”
‘बिग बॉस’चा तो निर्णय अन् निक्कीने काढली वर्षा उसगांवकरांची अक्कल, पाहा व्हिडीओ
अंकिता पुढे म्हणाली, “मी पहिल्यांदाच फोनशिवाय कुठेतरी राहणार आहे. याबद्दल मला थोडं अवघड वाटतंय, पण माझा निर्धार मात्र पक्का आहे. जर ‘बिग बॉस’ने मला संधी दिली घरात काहीतरी घेऊन जायचं, तर मी माझा फोन घेऊन जाईन. फोनशिवाय राहाणं मला कठीण वाटत असलं तरी मी माझ्या कोकणी अंदाजात सगळ्यांना प्रभावित करण्यासाठी आता घरात सज्ज आहे. माझ्या मित्रांनी देखील मला सल्ले दिले आहेत की, घरात जाऊन जा भांडण कर जोरदार, भांडण केलेस तरच टिकशील. पण माझे असं आहे की, मी यावेळी नव्या सीझनमध्ये काही तरी वेगळे दाखवणार आहे. न भांडता छान वागून पॉझिटिव्ह राहीन. मी घरात जाण्याआधी शेवटचा फोन होणाऱ्या नवऱ्याला केला. त्याला सांगितलं की सगळ्यांची काळजी घे. आता गणपती येणार आहेत तर घरात सगळी व्यवस्था नीट कर व लक्ष असू दे.”
या शोमध्ये अंकिताचा प्रवास अनोखा आणि रोमांचक ठरणार आहे. अंकिता प्रभू-वालावलकर ‘बिग बॉस’च्या घरात कोणता कोकणी हिसका दाखवणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस’ मराठीचा पाचवा सीझन दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर पाहता प्रसारित होत आहे.