Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील गणित दिवसेंदिवस बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. घरात पहिल्या दिवसापासून दोन गट पडले होते. परंतु, निक्की-अभिजीतच्या मैत्रीमुळे अरबाज गेल्या काही दिवसांपासून काहीसा नाराज होता. तर, इरिनाने अरबाजशी मैत्री करणं हे निक्कीला पटलेलं नाही. या दोन्ही गोष्टींमुळे आज संपूर्ण घरात एक वेगळाच ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
वैभव, इरिना, जान्हवी, निक्की आणि अरबाज एकत्र बसलेले असतात. यावेळी निक्की इरिनावर प्रचंड संतापते. “इरिनाने अरबाजचं डोकं दाबणं, त्याच्याशी मैत्री करणं हे मला पटत नाही” असं वक्तव्य निक्कीने जाहीरपणे घरात केलेलं आहे. त्यामुळे निक्की, “बरं झालं ही ( इरिना) नॉमिनेट झाली. बाहेर गेली तरी चालेल ही माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती” असं सर्वांसमोर म्हणते.
हेही वाचा : Video : “मी आता बैल झालोय…”, म्हणत निक्कीच्या ‘त्या’ कृतीवर वैतागला अरबाज! मैत्रीत फूट, नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi : निक्कीने आर्याचा केला अपमान
निक्कीच्या बोलण्याने वैभव चांगलाच संतापतो. तिला “हे अती होतंय” अशी ताकीद देखील वैभव देतो. परंतु, निक्की त्याच्याशी अजून वाद घालू लागते. शेवटी टेबलावर ठेवलेली जेवणाची ताटं निक्की लाथेने उडवते. यानंतर अरबाज निक्कीने लाथेने उडवलेली भांडी उचलत असल्याचं आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळालं.
जेवणाच्या दोन ताटांना लाथ मारणारी निक्की काही वेळानंतर आर्याला “जास्त डाळ घेऊन जेवू नकोस…सर्वांना पुरली पाहिजे” असं सांगते. यावर वैद्यकीय कारणांमुळे आर्या जास्त डाळ खात असल्याचं जान्हवी स्पष्ट करते. परंतु, निक्कीने केलेल्या अपमानामुळे ती जेवणाचा एकही घास न खाता तशीच बाल्कनीत निघून जाते.
आर्याची समजूत काढायला संपूर्ण ‘बी’ टीम बाल्कनीत जाते. यामध्ये केवळ अभिजीत जात नाही. सगळेजण निक्कीने आर्याची माफी मागावी असा मुद्दा पुढे करतात. मात्र, शेवटपर्यंत निक्की कोणाचंही ऐकून घेत नाही.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : वैभवची ‘ती’ डील फसली! बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले ४ सदस्य, कोण आहेत ते?
आधी जेवणाच्या ताटाला लाथाडणं आणि त्यानंतर आर्याचा अपमान करणं या दोन्ही गोष्टींमुळे नेटकरी निक्कीवर प्रचंड संतापले आहेत. “निक्की काहीही बरळत असते”, “बिग बॉस याकडे लक्ष द्या”, “आर्याची माफी मागायला हवी”, “जेवणावरून बोलणं हे कोणते संस्कार आहेत? आणि काय ती भाषा…निक्कीला लाज कशी वाटत नाही”, “आर्याला घरातील लोकांनी जो त्रास दिला तो महाराष्ट्राला आवडला नाही.” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी ‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या पोस्टवर केल्या आहेत.