‘बिग बॉस मराठी’चा बहुप्रतीक्षित पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने या नव्या रिअॅलिटी शोचा पहिला प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. छोट्या पडद्यावर सर्वात गाजणारा आणि चर्चेत असणारा लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’मराठीला ओळखलं जातं. या शोचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. याबाबत आता मालिकेने अधिकृतपणे अपडेट शेअर केली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात प्रेक्षकांना काही खास गोष्टी पाहायला मिळतील. एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॉसिप, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अनुभवायला मिळेल. परंतु, यंदा शोमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे आतापर्यंतचे चार सीझन ‘बिग बॉस मराठी’चं होस्टिंग दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र, आता ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख सांभाळणार आहे.
हेही वाचा : “मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून…”, पुण्यातील पोर्शे कार अपघाताबद्दल मराठी दिग्दर्शकाची पोस्ट
रितेश देशमुखला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहताच त्याच्या सगळ्या चाहत्यांनी अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याशिवाय त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखने सुद्धा नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर करत दोन शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘बिग बॉस मराठी’चा प्रोमो शेअर करत जिनिलीयाने Can’t Wait असं दोन शब्दांचं कॅप्शन दिलं आहे. याशिवाय या स्टोरीमध्ये अभिनेत्रीने हार्ट इमोजी देखील लावला आहे. त्यामुळे नवऱ्याला होस्ट म्हणून पाहिल्यावर जिनिलीया चांगलीच आनंदी झाल्याचं स्पष्ट होत आहे.
“मराठी मनोरंजनाचा ‘BIGG BOSS’ सर्वांना ‘वेड’ लावायला येतोय…’लयभारी’ होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख!” असं कॅप्शन देत वाहिनीने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली. आता हा सीझन केव्हा सुरू होणार याची तारीख व वेळ जाणून घेण्यासाठी मराठी प्रेक्षक उत्सुक आहेत.