Bigg Boss Marathi Season 5 : सध्या छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरू होताच स्पर्धकांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासून प्रत्येक स्पर्धक स्वतःच्या रणनीतीने खेळताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून स्पर्धकांमध्ये वाद पाहायला मिळत आहे. आज रितेश देशमुखचा ‘भाऊचा धक्का’ पार पडणार आहे. त्याआधी ‘भाऊचा धक्का’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या गाण्यात रितेश देशमुखचा हटके स्वॅग, स्टाईल पाहायला मिळत आहे. ‘भाऊचा धक्का’ गाणं कोणी गायलं, लिहिलं आणि संगीतबद्ध केलं? जाणून घ्या…
“लपून सारी, बघून बारी, डोक्यात त्याच्या गेलंया…साऱ्यांना टाइट, करणार राइट, हिशोब त्यानं केलंया…हटके स्टाईल, किलर स्माईल, धिंगाणा असा करलं…टेन्शन देणार, हिशोब घेणार, कला आता होणार”, असे ‘भाऊचा धक्का’ गाण्याचे बोल आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) तिसऱ्या पर्वात झळकलेल्या स्पर्धकाने हे गाणं लिहिलं असून ते गायलं आणि संगीतबद्ध देखील केलं आहे. यासंदर्भात त्यानं स्वतः पोस्ट करून माहिती दिली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या गाण्याचा गायक, गीतकार आणि संगीतकार दुसरा, तिसरा कोणी नसून अभिनेता, गायक, डॉक्टर उत्कर्ष शिंदे आहे. उत्कर्षने हे गाणं पोस्ट करत लिहिलं आहे, “ज्या ‘बिग बॉस मराठी’मध्ये स्पर्धक म्हणून नाव मोठं करता आलं. ज्या ‘बिग बॉस’ने मास्टरमाइंड, ऑलराउंडर, टास्क मास्टर, एंटरटेनमेंट किंग अशी नावे देऊन वेगळी ओळख दिली. त्याच कर्मभूमीसाठी, त्याच घरासाठी, त्या माझ्या ‘बिग बॉस मराठी ५’साठी हे ‘भाऊचा धक्का’ गाणं बनविण्याची संधी मिळाली. जिथे पुन्हा गाण्याचा टास्क एका दिवसात मी पूर्ण केला गायक, गीतकार, संगीतकार म्हणून. ही कामगिरी पार पाडताना दिग्गज केदार शिंदे सर यांचं मोलाच मार्गदर्शन मिळालं. त्यांची एनर्जी बघून खूप काही शिकायला मिळालं. धन्यवाद कलर्स मराठी, बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ).”
हेही वाचा – Bigg Boss Marathi: ‘डबल ढोलकी’ म्हणणाऱ्या सदस्यांना अभिजीत सावंतचं गाण्यातून उत्तर, पाहा व्हिडीओ
नेटकऱ्यांकडून गाण्याचं कौतुक
उत्कर्ष शिंदेच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “भारीच”, “उत्कर्ष शिंदेचा विषय हार्ड असतो”, “एक नंबर”, “अफलातून”, “जबरदस्त”, “लय भारी गाणं”, “नादखुळा दादा”, “कडक”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.