Bigg Boss Marathi 5 Bhaucha Dhakka : ‘बिग बॉस मराठी’चे चाहते वीकेंडची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण, रितेश नेमकी कोणाची शाळा घेणार? घराबाहेर कोणता सदस्य जाणार, घरात चुकीचं वागणाऱ्या सदस्यांना रितेश काय शिक्षा देणार याचं सगळं कोडं भाऊच्या धक्क्यावर उलगडतं.
‘बिग बॉस मराठी’च्या गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना निक्कीची दादागिरी पाहायला मिळाली. नॉमिनेट झाल्याच्या रागात निक्कीने घरातली सगळी कामं करण्यास नकार दिला होता. यावेळी वर्षा उसगांवकर घराच्या कॅप्टन होत्या. त्यामुळे निक्कीच्या या वागणुकीचा सर्वांनाच मनस्ताप झाला होता. घरात केलेली चुकीची वक्तव्य, दिवसभर नियमभंग करून झोपा काढणं, काम करण्यास दिलेला नकार, टास्कमधली दादागिरी एकंदर घरातील हे सगळं वागणं निक्कीला भाऊच्या धक्क्यावर भोवलं आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : छोटा पुढारी घन:श्याम झाला Eliminate! ना निक्की, ना अरबाज…जाताना थेट B टीमच्या ‘या’ सदस्याला दिली पॉवर
Bigg Boss Marathi : रितेश देशमुखकडून निक्कीला मोठी शिक्षा
भाऊच्या धक्क्यावर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर निक्कीची चांगलीच वरात निघाली. घरात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांबद्दल रितेशने तिला जाब विचारला. रितेश तिला म्हणाला, “कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही. अशाप्रकारची दादागिरी मी खपवून घेणार नाही. इथून पुढे संपूर्ण सीझनभर तुम्ही कधीही कॅप्टन होऊ शकत नाही.”
रितेशने दिलेल्या या शिक्षेमुळे ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपेपर्यंत निक्की आता यापुढे कधीच घराची कॅप्टन होऊ शकणार नाही. याशिवाय तिला आणखी एक मोठी शिक्षा देण्यात आली आहे. घरात चहाची भांडी घासण्यावरून निक्कीची आर्याबरोबर भांडणं झाली होती. यावेळी निक्कीने “कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही” असं वक्तव्य केलं होतं. यावेळी तिला सूरज, धनंजय आणि अन्य सदस्यांनी कोणालाही अशाप्रकारे आक्षेपार्ह बोलू नकोस असं समजावलं होतं. तरीही, निक्की कोणाचंच ऐकली नाही.
रितेशने याप्रकरणी भाऊच्या धक्क्यावर भाष्य करत निक्कीला जाब विचारला. एवढंच नव्हे तर, आता येणारा संपूर्ण आठवडा निक्कीने घरातल्या सगळ्यांची भांडी घासायची असे सक्त आदेश अभिनेत्याने दिले आहेत.
निक्कीकडून कॅप्टन्सी तर कायमची गेली आणि याशिवाय आता येत्या आठवड्यात तिला घरातील सर्व सदस्यांची भांडी घासावी लागणार आहेत. या शिक्षेचं पालन केलं नाहीतर… निक्कीला थेट नॉमिनेट करा असं रितेश देशमुख ‘बिग बॉस’च्या टीमला सांगणार आहे.
दरम्यान, रितेशने निक्कीसाठी या दोन्ही शिक्षा जाहीर केल्यावर घरातील अन्य सदस्यांमध्ये विशेषत: ‘टीम बी’मध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. एवढंच नव्हे, तर नेटकऱ्यांनी सुद्धा रितेशचं कौतुक केलं आहे.