Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या दणक्यात सुरू आहे. या कार्यक्रमाच्या टीआरपीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु, शोमधील चार ते पाच सदस्यांनी या आठवड्यात काही जणांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत टिप्पणी केल्यामुळे रितेश देशमुखने निक्की, अरबाज, आर्या, वैभव या स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे. निक्कीने आठवड्याच्या सुरुवातीला बाहुल्यांचा टास्क संपल्यावर वर्षा यांच्या मातृत्त्वावर भाष्य केलं होतं. निक्कीच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र नाराजी पसरली होती. वर्षा यांच्या चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी निक्कीच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला होता. रितेशने देखील भाऊच्या धक्क्यावर निक्कीला याबद्दल जाब विचारत तिला खडेबोल सुनावले आहेत. तसेच केवळ माफी मागून उपयोग नाही असं सांगत अभिनेत्याने निक्कीची चांगलीच कानउघडणी केली आहे. रितेश नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश निक्कीला म्हणतो, “तुमचा एक स्वतंत्र बिग बॉस ( Bigg Boss Marathi ) सुरू आहे ‘निक्कीचा बिग बॉस’…! तुमच्या ‘बिग बॉस’मध्ये तुम्ही कोणत्याही थराला जाता, समोरच्या माणसाचा वाटेल तसा अपमान करता आणि हे सगळं करून नंतर सॉरी बोलता. पण, आमच्या ‘बिग बॉस मराठी’मध्ये सॉरी बोलावं लागेल असं कोणी वागायचंच नसतं…हे असं वागणं तुम्हाला काही जमणार नाही.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 मधील ‘या’ स्पर्धकाचं कास्टिंग चुकीचं, आधीच्या पर्वातील अभिनेत्री म्हणाली, “महाराष्ट्रातील…”

रितेश देशमुखने केली निक्कीची कानउघडणी

रितेश पुढे म्हणाला, “दररोज चुका करून इतक्या वेळा सॉरी बोलू नका की, एक दिवस प्रेक्षक तुम्हालाच सॉरी म्हणतील आणि ‘बिग बॉस मराठी’मधून तुम्हाला बाहेर करतील. तुम्ही या आठवड्यात वर्षा यांच्याबद्दल जे वक्तव्य केलंत…त्यासाठी कुठेही माफी नाही. तुम्ही त्यांना म्हणालात, ‘वर्षाजी तुम्हाला आईच्या भावना कशा कळणार?’ तुम्ही कोणाच्या तरी मातृत्त्वावर भाष्य केलंय आणि तुम्ही एक स्त्री आहात. निक्की या भावना खरंतर तुम्हाला कळल्या पाहिजेत. आमच्या मराठी ‘बिग बॉस’मध्ये माफी मागायचं नाटक करायचं असेल, तर खुशाल करा. अख्खा महाराष्ट्र बघतोय…पहिल्या आठवड्यात तुम्ही सॉरी म्हणालात, दुसऱ्या आठवड्यात सॉरी म्हणालात आणि आताही तेच केलंत.”

“निक्की सॉरी हृदयातून आलं पाहिजे फक्त ओठावरती येऊन उपयोग नाही. तुमचं ठरलेलं असतं रागाच्या भरात मी हवं ते करेन, नंतर सॉरी बोलेन आणि आणखी एक आठवडा पुढे जाईन. तुम्ही एका शोमध्ये आहात आणि इथे शंभर कॅमेरे आहेत, तुमचा प्रत्येक शब्द कॅप्चर केला जातो. तुम्ही जे बोलता ते आज घराघरांत लोक पाहत आहे त्यामुळे जबाबदारीने बोलणं तुम्हाला भाग आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या या एका वाक्याने फक्त या एका व्यक्तीचं मन दुखवलं गेलंय…तुम्हाला अंदाजही नाहीये की सध्या मराठी घरांमध्ये यामुळे काय परिणाम झालाय आणि हे सगळं करून शो जिंकणार असं वाटत असेल, तर निक्की तुम्ही चुकीचा ‘बिग बॉस’ खेळताय.” असं रितेशने निक्कीला सांगितलं.

हेही वाचा : “प्रिय नवरोबा तुझा अभिमान…”, ‘बिग बॉस मराठी’चा रेकॉर्डब्रेक TRP पाहून जिनिलीयाचा आनंद गगनात मावेना! रितेशला म्हणाली…

निक्कीवर रितेश देशमुख संतापला ( Bigg Boss Marathi ) फोटो सौजन्य : कलर्स मराठी व जिओ सिनेमा

अभिनेता पुढे वर्षा उसगांवकरांना उद्देशून म्हणाला, “वर्षाजी तुम्ही हा विषय वाढवू शकला असता…याच्यावर वाद घालू शकला असता पण, असं न करता हा विषय तुम्ही अतिशय संयमाने हाताळला, एकही शब्द बोलला नाहीत आणि माफी मागितल्यावर तुम्ही पटकन माफही केलं… यासाठी खरंच तुमचं खूप कौतुक आहे.” सरतेशेवटी “वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी न करता हा गेम खेळा, इथे काय सुरूये याबद्दल संवाद साधा…कोणाच्याही कुटुंबीयांबद्दल किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करू नका” अशी ताकीद रितेश देशमुखने Bigg Boss Marathi च्या सर्व सदस्यांना दिली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi riteish deshmukh angry reaction on nikki motherhood statement about varsha usgaonker sva 00