Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा नुकताच पार पडलेला भाऊचा धक्का हा नेहमीपेक्षा काहीसा वेगळा पाहायला मिळालं. रितेश नेहमीच सगळ्या सदस्यांची कानउघडणी करताना दिसतो. परंतु, या व्यतिरिक्त अभिनेता घरातल्या सर्व सदस्यांशी नेहमी हसून खेळून संवाद साधतो. मात्र, रविवारच्या ( २५ ऑगस्ट ) भागात पहिल्यांदाच रितेश एका टास्कदरम्यान घन:श्यामवर प्रचंड भडकला होता. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…
रितेशने भाऊच्या धक्क्यावर घन:श्यामला एक टास्क दिला होता. यामध्ये विविध टॅग्ज घरातील अन्य सदस्यांना द्यायला सांगितले होते. यावेळी छोट्या पुढारीने माचिस म्हणजे धनंजय दादा आणि साप म्हणजे पॅडी दादा आहेत असं सांगितलं. याशिवाय अंकिताला घन:श्यामने खंजीर हे चिन्ह दिलं. यानंतर रितेशने “घन:श्यामला चावीचा माकड हे चिन्ह कोणाला देशील?” असं विचारलं यावर, “सर हे चिन्ह देणं अवघड आहे मी कोणालाच देऊ शकत नाही” असं सांगत घन:श्यामने या चिन्हाची उपमा कोणासही देण्यास नकार दर्शवला. घन:श्यामची ही कृती पाहून रितेश देशमुख चांगलाच भडकला.
नेमकं काय घडलं?
“तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एकतर चिन्ह द्या नाहीतर घराबाहेर या” असं रितेशने स्पष्ट सांगितलं. परंतु, एवढं बोलूनही घन:श्यामने चावीचा माकड हे चिन्ह कोणालाही दिलं नाही. इतरांनी देखील “देऊन टाक” असं घन:श्यामला सांगितलं पण, त्याने शेवटपर्यंत कोणाचंच ऐकलं नाही.
रितेशने शेवटी “या चला संपलाय टास्क” असं सांगत त्याला जागेवर बसण्यास सांगितलं. यानंतर घन:श्याम म्हणाला, “सर, मी मनापासून तुमची माफी मागतो. यापुढे माझ्याकडून ही चूक कधीच होणार नाही. मला शिक्षा नका देऊ…मला घराबाहेर जायचं नाहीये.” रितेश यावर पुढे म्हणाला, “एकतर तुम्ही दिसत नाही म्हणून तुमच्यासाठी हा टास्क ठेवला. तुम्ही काहीतरी बोलावं, करावं हा उद्देश होता पण, त्यात सुद्धा तुम्हाला नाही करायचंय. घन:श्याम इथून पुढे होणार काहीच सांगू नका कारण, मी यापुढे तुमच्याशी बोलणारच नाहीये.”
हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’मध्ये मानकाप्याची दहशत! पण, जेलमधल्या जान्हवीला घरात पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “दोन दिवसांत…”
रितेश भडकल्याचं पाहताच घन:श्याम त्याला “एक संधी द्या सर” असं म्हणत विनवणी करू लागला. पण, रितेश यावर म्हणाला, “तुम्हाला मी एक संधी देतो…आज तुम्हाला एलिमिनेट करणार नाही. पण, इथून पुढे माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेऊ नका. आता शांत बसायचं. तुमचा टास्क, गेम इथेच संपलाय. याच्यापुढे नाटकं बंद आणि माझ्यासमोर तर अजिबात करायची नाही.” एवढंच नव्हे तर “याच्यावरचा क्लोझअप काढून टाका” असं देखील रितेश ‘बिग बॉस’च्या टीमला सांगतो.
दरम्यान, रितेश देशमुख घन:श्यामवर भडकल्यामुळे सध्या सर्वांनी अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. तसेच अशाप्रकारे त्यांनी इतर सदस्यांना देखील झापलं पाहिजे असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd