‘बिग बॉस १६’ शोचा ग्रँड फिनाले काही अवघ्या सात दिवसांवर आहे. या शोमधील शेवटचं नॉमिनेशन कार्य पार पडलं. या नॉमिनेशन कार्यामध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, सुम्बुल तौकीर नॉमिनेट झाले. तर प्रियंका चौधरी, शालीन भानोत व अर्चना गौतमने फिनालेमध्ये प्रवेश केला. पण ‘बिग बॉस’ने हा अन्याय केला असल्याचा आरोप ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने म्हटलं आहे.
नॉमिनेशन टास्कसाठी घरामध्ये तीन तीन सदस्यांच्या दोन टीम करण्यात आल्या. एका टीममध्ये प्रियंका अर्चना, गौतम होते. तर दुसऱ्या टीममध्ये शिव, सुम्बुल व एमसीस्टॅन होते. टीममधील प्रत्येक सदस्याला ९ मिनिटांचा अंदाज घेत २७ मिनिटांच्या आसपास पोहोचायचं होतं. यामध्ये सुम्बुलने अधिक वेळ घेतल्यामुळे त्यांच्या टीमला हार पत्करावी लागली. याबाबत आता मेघाने भाष्य केलं आहे.
काय म्हणाली मेघा धाडे?
‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मेघा म्हणाली, “या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क तुम्ही पाहिलंत का? प्रियांका, अर्चना या दोघींनीही सुरुवातीपासूनच कोणत्याच टास्कमध्ये उत्तम काम केलं नाही. या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कसाठी कोणी १२ मिनिटं, कोणी ७ तर कोणी १४ मिनिटं घेतली. हा टास्क त्यांनी अगदी चुकीचा खेळला. तरीही अर्चना, प्रियंका, शालीन नॉमिनेट नाहीत. पण ज्या मुलाने अगदी योग्य टास्क खेळला म्हणजेच शिव त्याने ९ मिनिटं १० सेकंद घेतली. घड्याळ्याचा वापर न करता तो इतका परफेक्ट होता तरीही आज तो नॉमिनेट आहे.”
“एमसी स्टॅननेही १० मिनिटं घेतली. तोही नॉमिनेशनमध्ये आहे. ‘बिग बॉस’ने या ग्रुपबरोबर इतकं अनफेअर खेळण्याचा निर्णय का घेतला? ‘बिग बॉस’ने इतकं चुकीचं का केलं? अन्यायाची पण एक हद्द असते. जो स्पर्धक सुरुवातीपासून खेळत आहे त्याच्याबरोबरच या गोष्टी घडत आहे यावर मी नाखुष आहे. तिकीट टू फिनाले मिळालं नाही, नॉमिनेट झाला तरीही ट्रॉफी शिव ठाकरेच जिंकणार.” असंही मेघा म्हणाली. शिव ट्रॉफी जिंकणार असा मेघाला विश्वास आहे.