‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे तो चर्चेत असतो. गेल्या वर्षा अखेरीस अक्षयने गर्लफ्रेंड ‘रमा’ला सगळ्यांसमोर आणलं आणि लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता अभिनेत्याच्या लग्नाचा मुहूर्त ठरल्याचं समोर आलं आहे. ही आनंदाची बातमी अक्षयने स्वतः सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
गेल्या वर्षी २३ डिसेंबरला अक्षय केळकरच्या नात्याला १० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अभिनेत्याने गर्लफ्रेंड रमा कोण? याचा खुलासा केला. रमाबरोबरचा एक सुंदर व्हिडीओ त्याने शेअर केला होता. तसंच युट्यूब चॅनेलवर अक्षयने रमा विषयी आणि लव्हस्टोरीबाबत सांगितलं. एवढंच नव्हे तर लग्न करणार असल्याचंदेखील त्याने जाहीर केलं होतं. तेव्हापासून अक्षय रमाबरोबर फिरतानाचे व्लॉग सातत्याने युट्यूबवर शेअर करताना दिसत आहे. नुकतीच अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट लिहित लग्नाचा महिना सांगितला आहे.
अक्षय केळकरने रमाबरोबरचे सुंदर फोटो शेअर करत लिहिलं, “मे २०२५ मुहूर्त ठरला आहे. आता ना फिरणे माघारी, वाजवा हो तुतारी, करा ही तयारी…तरीही मुलींनो, आय लव्ह यू…मी फक्त तुमचाच आहे.” अक्षयच्या या पोस्टने पुन्हा एकदा चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
इतर कलाकार मंडळींसह चाहते अक्षय केळवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेता प्रथमेश परब, समृद्धी केळकर, आशिष पाटील, गायत्री दातार, मेघना एरंडे, अमृता धोंगडे या कलाकारांनी अक्षयला शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय केळकरची होणारी बायको कोण आहे?
अक्षय केळकरच्या ‘रमा’चं खरं नाव साधना काकतकर असं आहे. ती गायिका, गीतकार आहे. अक्षय केळकर आणि समृद्धी केळकरच्या ‘नाखवा’, ‘मैतरा’ गाण्यांसाठी साधनाने काम केलं होतं. साधनाचा मंत्रमुग्ध आवाज ऐकूनच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता.
अक्षय केळकरची लव्हस्टोरी…
अक्षयने साधनाला एकांकिकेत गात असताना पाहिलं. तिचा आवाज ऐकून अक्षयने ठरवलं की, हीच माझी प्रेयसी आणि बायको असेल. त्यानंतर अक्षयने सोशल मीडियाद्वारे तिच्या आवाजाचं कौतुक केलं. मग काही दिवसांनंतर अक्षयने दोन वेळा प्रपोज केलं. पण दोन्ही वेळेला साधनाने नकार दिला. अखेर साधनाने प्रपोज केलं आणि मग अक्षय-रमाची फिल्मी लव्हस्टोरी सुरू झाली; जिला १० वर्ष पूर्ण झाली आहेत.