‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा रंजक प्रवास आता लवकरच संपणार आहे. ‘बिग बॉस’ मराठीचा महाअंतिम सोहळा आज (८ जानेवारी) रंगणार आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याची जय्यत तयाराही सुरु आहे. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा होण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वाची सुरुवात २ ऑक्टोबरला झाली होती. यावेळी तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी झाले. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरातून प्रसाद जवादे बाहेर पडला. त्यानंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात मीड विक एव्हिकेशन पार पडले. यात अभिनेता आरोह वेलणकरला घराबाहेर जावे लागले. तब्बल १०० दिवसांचा खेळ पूर्ण केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले. यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे या स्पर्धकांचा समावेश आहे. यापैकी केवळ एका स्पर्धकाला बिग बॉस मराठीची मानाची ट्रॉफी मिळणार आहे.
आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीचा पहिला लूक समोर, पाहा व्हिडीओ
बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा आज (८ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजता रंगणार आहे. या खेळात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान यंदा बिग बॉस मराठीच्या घरात अनेक नवे ट्वीस्ट पाहायला मिळाले. तसेच बिग बॉसच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच दुहेरी एलिमिनेशन पाहायला मिळालं. या सीझनमध्ये अनेक गोष्टी स्पर्धक आणि प्रेक्षकांसाठी नव्या होत्या. अगदी घराच्या सजावटीपासून ते राखी सावंतच्या एन्ट्रीपर्यंत सगळ्याच गोष्टींमुळे प्रेक्षकांना धक्के मिळाले.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi Season 4 : मुंबईच्या रस्त्यांवर ‘शेवंता’साठी बॅनरबाजी; चाहते म्हणाले जिंकणार तर अपूर्वाच
दरम्यान ‘बिग बॉस खबरी’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील टॉप ५ स्पर्धकांचा व्होटिंग ट्रेंड शेअर करण्यात आला आहे. या ट्रेंडनुसार अभिनेता किरण माने पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ राखी सावंत दुसऱ्या स्थानावर, अपूर्व नेमळेकर तिसऱ्या, अमृता धोंगडे चौथ्या आणि अक्षय केळकर पाचव्या स्थानावर आहे. मात्र हे ट्रेंड कितपत खरा आहे, याबद्दल चाहते शंका उपस्थित करत आहे. तर दुसरीकडे यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण जिंकणार हे पाहणे? महत्त्वाचे ठरणार आहे.