Bigg Boss Marathi Season 5 : नुकत्याच झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’ची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. कारण आहे अरबाज पटेलच एलिमिनेशन. गेल्या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर नॉमिनेट झाले होते. या पाच सदस्यांपैकी कोण घराबाहेर होतं, याची हुरहूर ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांना होती. अखेर रविवार यावरच पडदा उघडला. आठव्या आठवड्यात कॅप्टन झालेला अरबाज थेट एलिमिनेट झाला.
एलिमिनेशनची प्रक्रिया ‘अशी’ पार पडली…
अरबाज, निक्की, वर्षा, सूरज आणि जान्हवी यांना अॅक्टिव्हिटी एरियामध्ये बोलावलं. या एरियामध्ये नॉमिनेट झालेल्या सदस्याची बॅग ठेवण्यात आली होती. या बॅगमध्ये संबंधित सदस्य सेफ आहे की डेंजर झोनमध्ये याच्या पाट्या ठेवण्यात आल्या होत्या. वर्षा, सूरज आणि जान्हवी यांच्या बॅगमध्ये सेफची पाटी होती. त्यामुळे हे तिघजण घराबाहेर जाण्यापासून वाचले. पण अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये गेले. त्यानंतर ‘बिग बॉस’ने अरबाज एलिमिनेट झाल्याचं जाहीर केलं. यावेळी निक्कीला धक्काच बसला. ती ढसाढसा रडू लागली. एवढंच नाहीतर अरबाज घराबाहेर जात असताना त्याचे पाय पकडून निक्की रडत होती. अरबाजच्या एलिमिनेशनची आता सर्वत्र चर्चा होतं आहे. यावर एका मराठी अभिनेत्याने मार्मिक पोस्ट केली आहे. जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
हेही वाचा – Video: वर्षा उसगांवकरांना कोथिंबीर वडी ओळखू येईना अन् मग…; पाहा नेमकं काय घडलं?
अरबाजच्या एलिमिनेशनवर मार्मिक पोस्ट करणारा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अभिजीत केळकर आहे. अभिजीत हा ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात झळकला होता. अरबाज घराबाहेर झाल्यानंतर अभिजीतने मोजक्या शब्दात पोस्ट लिहिली आहे. “त्याच्या पतंगाची दोरी तिनं तोडली”, असं लिहित अभिनेत्याने हसण्याचे इमोजी त्या खाली दिले आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’ची जोरदार चर्चा सुरू असली तरी दुसऱ्याबाजूला हे पर्व ७० दिवसांत गुंडाळणार असल्याचं समोर आलं आहे. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अनेक कलाकारांसह प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.