Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’मध्ये नुकताच फॅमिली वीक पाहायला मिळाला. यावेळी सदस्यांच्या कुटुंबातील मंडळींची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री झाली. यामुळे सर्व सदस्य भावुक झालेले पाहायला मिळाले. कुटुंबातील मंडळींनी त्यांना काय बरोबर, काय चूक किंवा बाहेर कसे दिसतायत हे सांगून एक प्रकारे सदस्यांना आरसा दाखवण्याचं काम केलं. कारण अवघ्या काही दिवसांवर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा येऊन ठेपला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर या आठ सदस्यांमधील एक जण यंदाच्या पर्वाचा विजेता होणार आहे. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस मराठी’कडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच अभिजीत सावंतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; ज्यामध्ये अभिजीत त्याची लव्हस्टोरी सांगताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आले शरद उपाध्ये, सूरजच्या लग्नाचा प्रश्न विचारताच दिलं जबदरस्त उत्तर, म्हणाले…

अभिजीत सावंतने लव्हस्टोरीचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “आमच्या लव्हस्टोरीची सुरुवात आमच्या कॉलनीमध्ये झाली. बरेच किस्से आहेत. पण त्यातला माझा एक आवडीचा क्षण हा आहे…शिल्पा नेहमीच माझा एक खंबीर पाठिंबा म्हणून राहिली आहे….आमची लव्हस्टोरी विकसित होत गेली आणि आमचे एकमेकांवरील प्रेम प्रत्येक वेळी अधिक दृढ होतं गेले.”

या व्हिडीओमध्ये अभिजीत आणि त्याची बायको शिल्पाचे जुने फोटो पाहायला मिळत आहे. त्यानंतर अभिजीत स्वतःची लव्हस्टोरी सांगत म्हणतो की, आमच्या लव्हस्टोरीमध्ये तसं म्हणायला गेलं तर खूप वेगवेगळे क्षण आले आहेत. आम्ही एकत्र कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझी बायको म्हणजेच त्यावेळेसची गर्लफ्रेंड शिल्पा आम्ही एकत्र अभ्यास करायचो. ती माझा अभ्यास घ्यायची आणि शिकवायची. तशीच आमची सुरुवात झाली. मला आठवतंय मी तिला पहिलं गिफ्ट दिलं होतं. १० रोमँटिक लोकप्रिय गाण्यांची कॅसेट दिली होती.

हेही वाचा – Video: सूरज चव्हाणच्या आई-वडिलांना पाहिलंत का? पुरुषोत्तमदादा पाटलांनी दाखवला फोटो, म्हणाले, “मला भरून आलंय…”

अभिजीत सावंतचा व्हिडीओ पाहा

दरम्यान, अभिजीत सावंतची सुंदर लव्हस्टोरी ऐकून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “गोड”, “तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनला आहात”, “जीवनात ही घडी अशीच राहू दे”, “संघर्षातला साथीदार तोच यशस्वी जीवनातला खरा भागीदार असतो”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अभिजीतच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 abhijeet sawant and shilpa sawant love story pps