Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे तीन दिवस बाकी आहेत. ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर यांच्यामधील एक जण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता होणार आहे. या अंतिम आठवड्यात मीड वीक एविक्शन पार पडणार आहे. त्यामुळे या सात सदस्यांपैकी कोणाची अंतिम फेरीत जाण्याची संधी हुकतेय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसऱ्या बाजूला सदस्यांचे नातेवाईक, चाहते सोशल मीडियाद्वारे भरभरून मतं देण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करत आहेत. अभिजीत सावंतच्या आई आणि सासूबाईंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अभिजीत सावंतच्या सोशल मीडियावर त्याच्या आई आणि सासूबाईंचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला अभिजीतची आई म्हणते, “माझा मुलगा जसा माझा आहे, तसाच तो महाराष्ट्राचा पण आहे. ‘इंडियन आयडल’च्या वेळी महाराष्ट्राने जसं त्याला भरभरून प्रेम दिलं, त्याला आपुलकी दिली आणि त्याला जिंकवून आणलं. त्याच प्रमाणे तो आता ‘बिग बॉस’मध्ये आहे. त्यामुळे तुमचा मुलगा समजून त्याला मत करून जिंकून आणा.”

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील लीला-रेवतीने सुंदर सादरीकरणाने नेटकऱ्यांची जिंकली मनं, ‘साथिया’ गाण्यावर केला डान्स

पुढे अभिजीतच्या सासूबाई म्हणाल्या की, एवढी २० वर्ष तुम्ही जे अभिजीतला प्रेम दिलंय, ते आताही द्या. आम्ही जसं त्याला मत करतोय तसं तुम्ही देखील करा. आमच्या अभिजीतला मत करा, असं आवाहन अभिजीतच्या आई आणि सासूबाईंनी प्रेक्षकांना केलं आहे.

आई आणि सासूबाईंचा व्हिडीओ शेअर करत अभिजीत सावंतने लिहिलं आहे, “माझ्या दोन्ही आईंना धन्यवाद. देवाने मला दोन इतक्या प्रेम आणि पाठिंबा देणाऱ्या आई दिल्या. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्याबरोबर असू दे.”

हेही वाचा – ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला दिवसाला मिळणार ५.४ लाख रुपये? ‘इतक्या’ कोटींची केली आहे मागणी

हेही वाचा – Video: “आपली नावं मोठी आहेत, त्यामुळे आपला वापर झालाय”, अभिजीतबरोबर गप्पा मारताना निक्की तांबोळीचं विधान; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

दरम्यान, अभिजीतच्या आई आणि सासूबाईंच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. “खरंच आई तुम्ही खूप छान संस्कार केले आहेत”, “हो आम्ही अभिजीतला नक्कीच मत देणार”, “अभिजीत खूप छान खेळतोय…माझ्या संपूर्ण कुटुंबाचं मत अभिजीतलाच आहे”, “खरंच अभिजीत जिंकायला पाहिजे. सूरज चव्हाणने पूर्ण पूर्व झापूक झुपूक करून काढलं आहे. त्याला विजेता करतील असं वाटतंय. पण आमचा विजेता अभिजीत सावंत आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.