Bigg Boss Marathi 5 Akshay Kumar : ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर आज बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार येणार आहे. ‘खेल खेल में’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने भाऊच्या धक्क्यावर उपस्थिती लावली आहे. यावेळी सगळ्यांनी मिळून रंगमंचावर कल्ला केल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. आठवडाभर हे सगळे स्पर्धक घरात काय करतात याची हजेरी रितेश देशमुखकडून भाऊच्या धक्क्यावर घेतली जाते. शनिवारच्या भागात रितेशने जान्हवी, अरबाज, वैभव, निक्की आणि घन:श्यामला त्यांच्या चुकीच्या वागणुकीबद्दल खडेबोल सुनावले होते. विशेषत: अभिनेत्याने जान्हवीची चांगलीच कानउघडणी केली. तर, दुसऱ्या ग्रुपच्या सदस्यांना आता पिकनिक बंद करा आणि खेळायला लागा अशी ताकीद रितेशकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : योगिता चव्हाणला अश्रू अनावर; रितेशसमोर व्यक्त केली ‘बिग बॉस’ सोडण्याची इच्छा, पण…; नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi : अक्षय कुमार करणार कल्ला

रितेशने केवळ शाळा न घेता सूरज, योगिता यांसारख्या खेळाडूंचं कौतुक देखील केलं. तसेच कोणालाही न घाबरता अजून मोकळेपणाने खेळा असा सल्ला देखील अभिनेत्याने या दोघांना दिला आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रविवारी अक्षय कुमार येणार आहे. अक्षय येताच वर्षा उसगांवकरांना म्हणतो, “वर्षा किती वर्षांनी दिसलीस तू” यावर अभिनेत्री हसू लागतात. तर, धनंजयला अक्षय विचारतो, “काय डीपी दादा मटण मिळालं की नाही घरात?” यावर धनंजय म्हणतात, “नाही पहिल्याच आठवड्यात मिळालं” यानंतर घरात एकच हशा पिकतो.

अक्षय कुमारसमोर सूरज सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग असणाऱ्या ‘झापुक झुपूक’ गाण्यावर डान्स करत असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. सूरजला डान्स करताना पाहून रंगमंचावर रितेश अन् अक्षयने देखील ‘झापुक झुपूक’ गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : Video : वर्षा उसगांवकरांना “हे घाणेरडं तोंड मला दाखवू नका,” म्हणणाऱ्या जान्हवीला रितेश देशमुखने सुनावलं; म्हणाला, “जितके प्रोजेक्ट्स…”

Bigg Boss Marathi : सूरजने धरला ठेका ( फोटो सौजन्य : जिओ सिनेमा )

‘बिग बॉस मराठी’चा हा नवा प्रोमो नेटकऱ्यांच्या देखील चांगलाच पसंतीस उतरला आहे. “सूरज चव्हाणचा डान्स तर अक्षय कुमारला पण आवडला”, “गुलीगतने आता अक्षय कुमारला सुद्धा डान्स करायला लावलं” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत. आता ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात कोणता स्पर्धक घराचा निरोप घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, पंढरीनाथ, निक्की, घन:श्याम, निखिल दामले हे सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. आता यापैकी कोण घराचा निरोप घेणार याचा उलगडा येत्या काही तासांत होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 akshay kumar riteish deshmukh dance on zapuk zupuk song with suraj chavan sva 00