Bigg Boss Marathi Season 5 : मागील आठवड्यापासून रितेश देशमुख ‘भाऊच्या धक्क्या’वर गैरहजर आहे. कारण कामानिमित्ताने रितेश देशमुख परदेशात आहे. त्यामुळे हा आठवडा देखील ‘भाऊचा धक्का’ रितेश शिवाय रंगला आहे. पण या ‘भाऊच्या धक्क्या’वर खास पाहुणे उपस्थित राहिले. आधीच्या पर्वातील गाजलेल्या सदस्यांनी खास पाहुणे म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील अभिजीत बिचुकले, पहिल्या पर्वातील पत्रकार अनिल थत्ते आणि चौथ्या पर्वात गाजलेली राखी सावंत हे खास पाहुणे उपस्थित राहिले. यावेळी या तिघांनी घरातील सदस्यांचं कौतुक करत आपलं परखड मत व्यक्त केलं. यादरम्यान अनिल थत्ते यांनी घरात येताच सूरज चव्हाणचं भरभरून कौतुक केलं. “उद्याचे दादा कोंडके” अशी उपमा त्यांनी सूरजला दिली.
हेही वाचा – Video: “तुमचं वय झालं” म्हणणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी अनोख्या अंदाजात दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ
अनिल थत्ते काय म्हणाले?
‘कलर्स मराठी’ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अनिल थत्ते सूरजचं कौतुक करताना दिसत आहेत. ते सूरजला म्हणतात, “सूरज तुला गेम समजायला जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्हा प्रेक्षकांना तुला समजायला लागला. पण माझी खात्री आहे, तू ज्या प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे वागतोय त्यावर आम्ही लुब्ध आहोत. तुझ्यावर आमचं प्रेम जडलंय.”
पुढे अनिल थत्ते म्हणाले की, दुसरी गोष्ट मला तुला सांगायची आहे. जसं दादा कोंडके ‘विच्छा माझी पुरी करा’तून आले. त्यावेळी त्यांचा एकूण जो काही अवतार होता त्याच्याबद्दल लोकं फारसे आशावादी नव्हते. पण त्याचं दादा कोंडके यांनी आपलं वर्चस्व सिल्व्हर ज्युबली चित्रपट देऊन सिद्ध केलं. सूरज मला तुझ्यामध्ये उद्याचे दादा कोंडके दिसतायत. मी जर चित्रपट काढला तर त्यात माझा हिरो तू असशील आणि हिरोईन तुझ्या निवडीने मला घ्यावी लागेल. पण एक सांगतो तुला, तू प्रेमाला लायक आहेस. आय लव्ह यू. खरंच भोळा आहेस. यावेळी अनिल थत्तेंनी सूरजची गालावर किस घेतली.
हेही वाचा – Video: निक्की तांबोळीचं नवाजुद्दीन सिद्दिकीबरोबरचं ‘हे’ आयटम साँग पाहिलंत का? केला होता जबरदस्त डान्स
दरम्यान, अनिल थत्तेंनी सूरज केलेलं कौतुक पाहून नेटकऱ्यांनी या प्रोमोवर खूप साऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सूरज मराठी सुपरस्टार झाला पाहिजे”, “तुच बिग बॉस जिंकणार भाई”, “अख्ख्या महाराष्ट्राची मनं जिंकली वाघानं”, “एका सामान्य माणसात इच्छाशक्ती असेल तर काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूरज”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.