Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आता दुसरा आठवडा सुरू आहे. पहिला आठवडा स्पर्धकांनी चांगलाच गाजवला. निक्की तांबोळी ही स्पर्धक चांगलीच चर्चेत राहिली. आता दुसरा आठवडा देखील वाद आणि राड्याने सुरू झाला आहे. बीबी करन्सीसाठी दोन गटांमध्ये वाद पाहायला मिळाला. अशातच अंकिता प्रभू वालावलकर आणि छोटा पुढारी घनःश्याम दरवडे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अंकिता हात जोडून घनःश्यामच्या पाया पडताना दिसत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
शनिवार, रविवार झालेल्या रितेश देशमुखच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर फ्रेंडशिप डेनिमित्ताने एक खेळ खेळण्यात आला. या खेळात घरातील स्पर्धकांना एकमेकांच्या गळ्यात लॉकेट घालायचं होतं. या लॉकेटवर काही खोचक असे शब्द लिहिण्यात आले होते. ‘मुर्ख मित्र’, ‘डबल ढोलकी’, ‘बालिश मित्र’ असे खोचक शब्द लिहिलेलं लॉकेट स्पर्धकांना इतर घरातील एका स्पर्धकाला घालायचे होते. यावेळी अंकिता प्रभू वालावलकर हिने घनःश्यामला ‘डबल ढोलकी’चं लॉकेट घातलं. हा खेळ पार पडल्यानंतर घनःश्याम अंकिताशी चर्चा करायला गेला. त्यावेळी चर्चा करत असताना छोट्या पुढारीने घेतलेली भूमिका पाहून अंकिताने थेट हातचं जोडले.
हेही वाचा – “शेतकऱ्याची पोरं…”, ऑलिम्पिकमध्ये अविनाश साबळेची कामगिरी पाहून हेमंत ढोमे भारावला, म्हणाला, “प्रचंड अभिमान…”
‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता व घनःश्याम ‘डबल ढोलकी’च्या लॉकेटवरून चर्चा करताना दिसत आहेत. ‘डबल ढोलकी’ लॉकेट देण्यामागचा हेतू नेमका काय होता? हे अंकिता घनःश्यामला समजवताना पाहायला मिळत आहे. यावेळी छोटा पुढारी म्हणाला, “‘डबल ढोलकी’ म्हणाल्यानंतर मला राग आला.” यावर अंकिता म्हणाली, “राग येणं ठीक आहे. पण तू तसा वागलास की नाही?” घनःश्याम म्हणाला, “हो. मी केलं. मी चुकही मान्य करतो.” त्यावर अंकिता म्हणते, “मला तेच कळतं नाहीये. तू नंतर कशाला चूक मान्य करतोस. तुला काय झालंय? पुढारीना तू?” घनःश्याम म्हणतो, “हो.” त्यानंतर अंकिता म्हणते, “तू नंतर चूक का मान्य करतोस?” त्यावर घनःश्याम म्हणतो, “मला लोक समजतं नव्हती. आता मला लोक समजली आहेत. डाव पण कळला आहे आणि मी इथून पुढे नीट करणार.” हे ऐकून अंकिता हात जोडून म्हणते, “मला तुझे चरण दे. मला महाराष्ट्राच राजकारण तुझ्यात दिसू लागलंय रे. तू खरंच पुढारी आहे भावा.” त्यानंतर अंकिता घनःश्यामच्या पाया पडायला जाते. तेव्हा तो म्हणतो, “पाय नको पडू.”
अंकिता व घनःश्यामचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. अनेकांनी छोट्या पुढारीला ट्रोल केलं आहे. “आगलाव्या पुढारी”, “याला बाहेर काढलं पाहिजे”, “निक्कीचा चमचा”, “पुढारी लोक नंतरच चूक मान्य करतात”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.