Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या सहावा आठवडा सुरू आहे. घरातील समीकरण पूर्णपणे बदलली आहेत. सुरुवातीपासून एकत्र खेळत असलेले सदस्य आता विरोधात खेळताना दिसत आहेत. यापैकी एक म्हणजे निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर. सुरुवातीच्या दिवसांमध्ये निक्की व जान्हवी एकमेकांसाठी काहीही करण्यासाठी तयार होत्या. पण आता निक्की व जान्हवीमध्ये सतत वाद होताना पाहायला मिळत आहे. जान्हवी निक्की विरोधात जबरदस्त खेळताना दिसत आहे. अशातच ‘बिग बॉस’ने चक्क जान्हवीला निक्कीसाठी चहा बनवण्याचा आदेश दिला आहे. याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टीआरपी मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस’च्या आदेशाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी चहा बनवताना दिसत आहे. तेव्हा ‘बिग बॉस’ निक्कीला विचारतात की, निक्की चहा हवाय का? निक्की म्हणते, “हो बिग बॉस.” त्यानंतर ‘बिग बॉस’ जान्हवीला म्हणतात की, जान्हवी एक कप चहा निक्की यांच्यासाठी वाढवाल का? हे ऐकून जान्हवी आश्चर्याने विचारते, “तुम्ही खरंच बोलताय?…नाही बिग बॉस नाही. पण जर तुमचा आदेश असेल तर करेन. फक्त तुमच्यासाठी करेन.”

हेही वाचा – Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील पुर्णिमा तळवलकरांचा भाचीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

पुढे ‘बिग बॉस’ म्हणतात, “मग माझ्यासाठी वाढवाल.” जान्हवी म्हणते, “ओके बिग बॉस फक्त तुमच्यासाठी करते.” तेव्हा बिग बॉस म्हणतात, “मला चहा प्यावासा वाटतोय.” त्यानंतर जान्हवी टोमणा मारत म्हणते की, निक्कीचा चहा बनवताना मी थोडी अक्कल किसून घालू शकते का?

हेही वाचा – रिअ‍ॅलिटी शोमुळे स्पर्धकांनी केल्या होत्या आत्महत्या! त्यागराज खाडिलकरचा धक्कादायक खुलासा, म्हणाला…

या आठवड्यासाठी कोण नॉमिनेट झालं?

दरम्यान, या आठवड्याच्या पहिल्या दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या सात सदस्यांना घरातल्या इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं. काल दुसऱ्या दिवशी घरात बीबी करन्सीसाठी ‘BB फार्म’ टास्क देण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही टीमला नळातून येणारं दूध जमा करायचं आहे. यात दोन टीम आहेत.

एका टीममध्ये निक्की, धनंजय, अरबाज, पॅडी, घन:श्याम हे सदस्य आहेत यांचा संचालक अभिजीत आहे. तर, वर्षा संचालक असलेल्या दुसऱ्या टीममध्ये आर्या, अंकिता, सूरज, जान्हवी आणि वैभव हे सदस्य आहेत. या टास्कच्या सुरुवातीलाच शक्तीचं प्रदर्शन झाल्यामुळे पहिली फेरी रद्द करण्यात आली. तसंच ‘बिग बॉस’कडून एक शिक्षा देखील देण्यात आली. दोन्ही टीममधील सदस्यांना विरोधी टीममधील एका सदस्याला बाद करायचं आहे. त्यामुळे आता दोन्ही टीममधील कोणता सदस्य बाद होतोय आणि कोण ‘बीबी टास्क’ जिंकतंय? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 bigg boss orders janhvi to make tea for nikki tamboli pps