Bigg Boss Marathi Season 5 : नुकताच बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सचिन पिळगांवकर निर्मित, दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात सचिन पिळगांवकरांसह सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, सिद्धार्थ जाधव अशी तगडी कलाकार मंडळी आहेत. त्यामुळे सध्या चित्रपटाची टीम ठिकठिकाणी प्रमोशन करताना दिसत आहे.
आता ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या टीमने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात हजेरी लावली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री केली. यावेळी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाची टीम घरातील सदस्यांबरोबर मजेशीर गेम खेळली. तसंच चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त डान्स केला. याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
हेही वाचा – Video: घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्की तांबोळीचा फुटला टाहो, ‘हे’ सदस्य झाले सेफ, पाहा प्रोमो
‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस मराठी’च्या ‘भाऊच्या धक्क्या’चा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये स्वप्नील जोशी, सुप्रिया पिळगांवकर ‘बिग बॉस मराठी’मधील सदस्यांबरोबर ‘डम डम डम डम डमरु वाजे’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. गाण्यातील हूकस्टेप सर्वजण करताना पाहायला मिळत आहेत. डॉ. निलेश साबळे देखील थिरकताना दिसत आहे.
हेही वाचा – किरण मानेंनी सोडली ‘तिकळी’ मालिका, आता झळकणार ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर; पोस्ट करत म्हणाले, “‘बिग बॉस’पासून…”
दरम्यान, या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेट आहेत. त्यामुळे आता आठव्या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. अशात दुसऱ्या बाजूला ‘बिग बॉस मराठी’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. १०० दिवस नाहीतर ७० दिवसांत ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व गुंडाळणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण अद्याप ‘कलर्स मराठी’ने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.