Bigg Boss Marathi: लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’ त्याचा पाचवा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘बिग बॉस मराठी’चे चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी या शोच्या चार पर्वाच्या सू्त्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. आता हटके अंदाजात कल्ला करायला मराठमोळा रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचं सूत्रसंचालन करण्यासाठी हजर झाला आहे.
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो (Bigg Boss Marathi Promo)
गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. नव्या होस्टसह आता हा शो अधिक मनोरंजक होणार आहे. बिग बॉस मराठीचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. आता बिग बॉस नक्की कोणत्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सूट घालून रितेश देशमुख पुणेरी ढोल वाजवताना दिसतो आहे.
“होणार ढोलताशांचा गजर, सळसळणार उत्साहाची लहर!
आज संध्याकाळी जाहीर होणार बिग बॉस मराठीची ‘तारीख’
मराठी मनोरंजनाचा बॉस “BIGG BOSS मराठी” लवकरच…
“फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर”
असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) हा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आज तारीख जाहीर होणार म्हटल्यावर चाहते आनंदी झाले आहेत. कलर्स मराठीने हा व्हिडीओ शेअर करताच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसंच या प्रोमोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “आता लवकर शो सुरू करा, खूप वाट बघितली आणि हिंदी बघून खूप कंटाळा आला आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “खूप वाट पाहिली राव, तेव्हा आज तारीख समजणार, लवकर हा शो सुरू करा, खूप उत्सुकता आहे.” तर अनेकांनी तारीख आधीच माहीत आहे असं सांगून २६ जुलै, २७ जुलै, २८ जुलै असा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठीचे याआधी दोन प्रोमो आले आहेत. तसंच आज तारीख जाहीर होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नवा सीझन नवा होस्ट आल्याने रितेश त्याच्या स्टाईलने कल्ला करणार आहे असं दिसतंय. अनेक कलाकारांनी या नव्या होस्टला शुभेच्छा देत त्याचं अभिनंदनदेखील केलं आहे.