कोल्हापुरचा ढाण्या वाघ म्हणून ओळखला जाणारा धनंजय पोवार उर्फ डीपी दादा नेहमी चर्चेत असतो. त्याने आपल्या विनोदी शैलीने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकल्यापासून धनंजय प्रसिद्धीझोतात आला आणि त्याचा चाहता वर्ग आणखी मोठा झाला आहे. धनंजय घराघरात पोहोचला आहे. अशा लोकप्रिय डीपीला एक नेटकरी सतत ट्रोल करत आहे. यामुळे धनंजय भडकला असून त्याने चांगलंच उत्तर दिलं आहे.
धनंजय पोवारचा फर्निचरचा व्यवसाय आहे. तो हा व्यवसाय सांभाळत पत्नी आणि आईबरोबर मजेशीर रील व्हिडीओ करत असतो. त्यावरून एक नेटकरी सतत प्रतिक्रियेतून धनंजयवर टीका करत आहे. त्या नेटकऱ्याला धनंजयने चांगलंच सुनावलं आहे.
सचिन जावळे असं त्या नेटकऱ्याचं नाव आहे. त्याने धनंजयच्या एका पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिलं की, याच्या डोक्यातला ‘बिग बॉस’चा किडा याला एक दिवस भिकेला लावेल. कारण ताटामध्ये चांगलं अन्न असून सुद्धा त्याचा अपमान करतो आणि याला ‘बिग बॉस’ आठवतो…बाई. तसंच दुसऱ्या पोस्टवर सचिन जावळेने लिहिलं, “सगळं घरदार नाटककार झालं आहे, सर्वसामान्यांची फसवणूक करून आपला व्यवसाय म्हणजे फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी, लोकांनी यांचे फर्निचर विकत घ्यावे म्हणजे नाटक पाहायला भेटेल.”
सचिन जावळेच्या याच प्रतिक्रिया आणि त्याचं प्रोफाइल इन्स्टाग्राम स्टोरीवर धनंजय पोवारने शेअर केलं आहे. पहिल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रोफाइल शेअर करत धनंजयने लिहिलं, “किती बोंबलत बसणार लोकांच्या नावाने भिकाऱ्या…आता याचा काय विषय?” तर दुसऱ्या स्टोरीमध्ये धनंजयने लिहिलं की, लोकांची किती घाणेरडी वृत्ती असेल…काय म्हणून हा माझ्या नावाने बोंबलत आहे काय माहीत नाही. ऊट सूट काय पण विषय काढायचं आणि बोंबलायचं…अरे बाबा मी तुला काय फसवलंय का? पैसे घेतलेत का? काय तुझं लग्न होईना म्हणून गावाची माप काढत बसणार आहेस…अशाने तुला पोरगी कोण देणार रे.”
![Dhananjay Powar Instagram Story](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/Dhananjay-Powar.jpeg?w=307)
![Dhananjay Powar Instagram Story](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/Dhananjay-Powar-2.jpeg?w=317)
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपल्यापासून सदस्य वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी धनंजय एका लोकप्रिय कार्यक्रमात झळकला होता. तो म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा ३’. यावेळी धनंजयसह अंकिता वालावलकरदेखील दिसली होती.