Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व आता शेवटच्या टप्प्यात आहे. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहेत. आता घरात फक्त आठ सदस्य राहिले आहे. अभिजीत सावंत, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि जान्हवी किल्लेकर यांच्यामधील एक सदस्य ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरणार आहे. याची उत्सुकता सगळ्या प्रेक्षकांना लागली आहे.
सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात फॅमिली वीक सुरू आहे. सदस्यांच्या कुटुंबातील मंडळी त्यांच्या भेटीस येत आहेत. आतापर्यंत वर्षा, अभिजीत, धनंजय, जान्हवी यांच्या कुटुंबातील मंडळी त्यांना भेटून गेली. यावेळी प्रत्येक सदस्य भावुक झाले. यादरम्यान धनंजयने आपल्या वडिलांना करून दिलेली ओळख निक्कीला खटकली. यामुळे तिला राग आला आहे. म्हणून धनंजय हात जोडून निक्की माफ मागताना दिसत आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.
धनंजयने निक्कीची ओळख कशी करून दिली?
धनंजयचे आई-वडील आणि पत्नी त्याच्या भेटीस आले होते. यावेळी धनंजयने वडिलांना निक्कीची ओळख वेगळा अंदाजात करून दिली. तो वडिलांना म्हणाला, “हे ‘वादळ’ आमच्या घरातलं.” तेव्हा धनंजयचे वडील म्हणाले की, ‘वादळ’ आहे म्हणून सगळं व्यवस्थित दिसतंय. तुझं काम छान आहे. यावेळी ‘वादळ’ म्हणून करून दिलेली स्वतःची ओळख निक्कीला खटकली. तिला वाईट वाटलं. त्यामुळे धनंजयने तिची माफी मागितली.
‘कलर्स मराठी’ने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये धनंजय निक्कीची माफी मागताना दिसत आहे. निक्की म्हणते की, तुम्ही दुसरं नाव घेऊन जी माझी ओळख करून देताय, ते मला बिलकुल पटत नाहीये. त्यावर धनंजय म्हणाला, “नाही नाही, त्याबद्दल सॉरी…मला अंकिता बोलली तिला थोडं वाईट वाटलं…मी मगाशी तुझ्याशी बोलणार होतो.” तेव्हा निक्की म्हणाली, “माझं जे नाव आहे, लोक त्या नावाने मला ओळखतात.” त्यानंतर धनंजय म्हणाला की, माझा हेतू वाईट नव्हता आणि अंकिताने सांगितल्यानंतर मी तुझी वैयक्तिक रित्या माफी मागायला येणार होता. मी खरंच हात जोडून तुझी माफी मागतो. माझा अजिबात दुसरी ओळख वगैरे असा काही हेतू नव्हता. मोठा भाऊ समज आणि खरंच अंतर्मनापासून माफी मागतो. मग निक्की म्हणते, “ठीक आहे काळजी घ्या.”
हेही वाचा – “हिंदू मुलीच्या प्रेमात पडलास, तर २ लग्न करणार का?” अरबाज पटेल म्हणाला, “आमच्या धर्मात चार…”
दरम्यान, या आठवड्यात सर्व सदस्यांना ‘बिग बॉस’ने नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा अंतिम आठवडा सुरू होणार आहे.