Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व दिवसेंदिवस अजून रंजक होत आहे. गेल्या आठवड्यातील रितेश देशमुखच्या ‘भाऊच्या धक्क्या’मुळे घरातील समीकरणं पूर्णपणे बदलली पाहायला मिळत आहेत. अशातच गुरुवारी २९ ऑगस्टला, ‘पाताळ लोक’ टास्क पार पडला. या टास्कमध्ये ‘ए’ टीममध्ये निक्की-अभिजीत, घन:श्याम – पॅडी, वैभव-धनंजय या जोड्या होत्या. तर ‘बी’ टीममध्ये जान्हवी-सूरज, अरबाज-आर्या, अंकिता-वर्षा या जोड्या होत्या. पण या टास्कमधील पहिल्या फेरीमध्येच वाद झाले. याच वादावरून धनंजय पोवारची आई व पत्नीने संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
पहिल्या फेरीत नेमकं काय घडलं?
‘पाताळ लोक’ टास्कमधील पहिली फेरी खेळण्यासाठी ‘ए’ टीममधून वैभव-धनंजय गेला होता. तर ‘बी’ टीममधून अरबाज-आर्या गेली होती. या दोन्ही जोड्यांमधील धनंजय व आर्या पाताळ लोकात सोन्याची नाणी जमा करण्यासाठी गेले. तर वैभव व अरबाज पाताळ लोकाच्या बाहेर राहून धनंजय व आर्याकडून दिलेली नाणी एका बॉक्समध्ये जमा करत होते. यावेळी खेळताना अरबाजकडून त्याचा बॉक्स तुटला. त्यामुळे पहिल्या फेरीच्या संचालक असलेल्या निक्कीने ‘बी’ टीमने जमा केलेली नाणी ग्राह्य धरली नाहीत. यावेळी संचालक जान्हवीने देखील रागाने ‘ए’ टीमचा बॉक्स तोडला आणि तिने देखील जमा केलेली नाणी ग्राह्य धरली नाही. या फेरीत धनंजयने पाताळा लोकातून सर्वाधिक नाणी आणली होती. पण संचालकांच्या निर्णयामुळे दोन्ही टीमला शून्य गुण मिळाले. याच पार्श्वभूमीवरून धनंजय पोवारची आई व पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा – “तोच माज, बॉडी लँग्वेज तशीच…”, जान्हवीला जेलमध्ये पाठवून काय फरक पडला? सुरेखा कुडची यांचा सवाल, म्हणाल्या…
“आजचा (२९ ऑगस्ट) भाग बघून तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा,” असं कॅप्शन लिहित त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला धनंजयची पत्नी म्हणते की, ‘ए’ टीमकडून ते अगदी जीव तोडून खेळत होते. वैभव आणि त्यांची जोडी खेळत होती. अरबाजच्या हातून बॉक्स पडला आणि तुटला होता. इथे चूक दुसऱ्या टीमची नव्हती. त्यांची स्वतःची होती. निक्की म्हणाली, ती नाणी ग्राह्य धरली जाणार नाहीयेत. त्यांनी जीव तोडून २७ नाणी गोळा केली होती. पूर्ण त्यांनी त्यांचा खेळ दाखवला आहे. तिथे आपल्याला त्यांचा खेळ दिसला आहे. त्यांनी हुशारीने खेळ खेळला.
पुढे धनंजयची आई म्हणाली, “त्याने बरोबर खेळला आहे. त्याने नाणी भरभरून गोळा केली होती. तो नाणी गोळा करून वैभवकडे देत होता. खेळता खेळता अरबाजचा बॉक्स पडला आणि फुटला. आमचा धनंजय कसा खेळतोय हे जनतेने बघितलं आहे. आम्ही पण बघितलं आहे. जनतेला काय वाटतं त्यांनी सांगा.” ( Bigg Boss Marathi )
त्यानंतर धनंजयची पत्नी म्हणाली, “यासंदर्भात तुम्ही कमेंटमध्ये कळवा. अॅक्शनला रिअॅक्शन आली पाहिजे. कोण बायस्ट खेळलं? कोण चांगलं खेळलं? कोणी १०० टक्के दिलं? आम्हाला संचालक चुकीचे लाभले. एकाबाजूला निक्की आणि दुसऱ्याबाजूला जान्हवी. दोघी ‘ए’ टीमच्या निघाल्या, आमची ‘बी’ टीम बिचारी पडली. त्यामुळे ‘ए’ टीम एकत्र आली तरी नव्वल वाटून घ्यायचं नाही. कारण ते एकत्र येणारच आहेत.”
दरम्यान, धनंजय पोवारच्या आई व पत्नीच्या मतांशी अनेकांनी सहमती दर्शवली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातून बाहेर झालेल्या योगिता चव्हाणने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘डीपी दादा रॉक्स’ असं तिने लिहिलं आहे. तसंच ‘डीपी दादा ट्रॉफी नक्की घेणार’, ‘डीपी दादा एक नंबरच खेळतात…लय भारी’, ‘डीपी दादा एक नंबर खेळला…निक्कीमुळे घाण झाली’, ‘तुमचं मत अगदी खरं आहे. निक्कीची अक्कल शून्य असल्यामुळे डीपी दादाची मेहनत वाया गेली’, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.