Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सातव्या आठवड्याच्या शेवटी एक घटना घडली. कॅप्टन्सी टास्कच्या वेळी आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. यामुळे शनिवारी (१४ सप्टेंबर) ‘भाऊच्या धक्क्या’वर ‘बिग बॉस’ने आर्याला कठोर शिक्षा देत थेट घराबाहेर केलं. पण यामुळे काही प्रेक्षक नाराज झाले असून निक्कीला देखील शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. एवढंच नव्हे तर आर्याला घराबाहेर केल्यामुळे ‘बिग बॉस मराठी’ पाहणं बंद केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. अशातच दुसऱ्या बाजूला ‘भाऊच्या धक्क्या’वरील मजेशीर व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओमध्ये डीपी म्हणजे धनंजय पोवार हटके अंदाजात वर्षा उसगांवकरांचं कौतुक करताना दिसत आहे.
‘टीआरपी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘भाऊच्या धक्क्या’वरील मजेशीर व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओत रितेश देशमुख म्हणतो की, मी आता काही जोडींची नाव घेईन. त्यांनी पुढे यायचं आहे. त्यातल्या एकाने चक्रावर उभं राहायचं आहे. ते चक्र गोल फिरत राहिलं आणि तुम्हाला पार्टनर असलेल्या सदस्याचं कौतुक करत राहायचं आहे. डीपी दादा या.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिका बंद होणार की वेळ बदलणार? जुई गडकरी चाहत्यांच्या प्रश्नांचं उत्तर देत म्हणाली…
त्यानंतर डीपी चक्रावर उभा राहतो आणि वर्षा उसगांवकरांचं कौतुक करताना म्हणतो, “वर्षा ताईंबद्दल मी काय बोलू…मी चुकून मोठ्या असल्यामुळे त्यांना ताई म्हटलं. सर खरोखर सांगतो, ज्यादिवशी यांना ताई म्हटलो, मला चुकल्यासारखं वाटलं. मी ३०, ३५ वर्षांपूर्वी जन्माला का आलो नाही आणि या बाईच्या प्रेमात पडलो नाही.”
पुढे फिरत्या चक्राचा वेग वाढला. तेव्हा खाली बसून डीपी म्हणाला की, भाऊ, मी यांच्या मागे लय जोरात फिरलो असतो. या बाईचं सौंदर्य म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही अभिनेत्रींपेक्षा सर्वात बेस्ट सौंदर्य या बाईकडे आहे. आबो..आबो…भाऊ, आता मी खरंच सांगतो या बाईचं सौंदर्य खरंच देखणं आहे. डीपीने हे हटके अंदाजात केलेलं कौतुक पाहून रितेश देशमुखसह घरातील सर्व सदस्यांना हसू अनावर झालं.
पाहा व्हिडीओ
दरम्यान, सातव्या आठवड्यात निक्की, वैभव, अंकिता, अभिजीत, वर्षा आणि आर्या नॉमिनेट झाले आहेत. आर्या नुकतीच घराबाहेर गेली असली तरी उर्वरित पाच सदस्यांमधील एक सदस्य बेघर होणार आहे. त्यामुळे आता निक्की, वैभव, अंकिता, अभिजीत आणि वर्षा उसगांवकरांपैकी कोण एलिमिनेट होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.