‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सदस्य सध्या खूप चर्चेत असतात. विजेता सूरज चव्हाणसह इतर सदस्यदेखील खूप प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. ‘बिग बॉस मराठी’ संपल्यापासून सदस्यांचे फोटो आणि व्हिडीओ सातत्याने व्हायरल होतं असतात. तसंच सदस्य एकमेकांच्या भेटी घेत असतात. अशातच इरिना रुडाकोवालाच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अलीकडेच इरिना रुडाकोवालाने हा डान्स व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने गरब्याचा आउटफिट परिधान करून डान्स केला होता. ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ चित्रपटातील ‘नगाडा संग ढोल’ या दीपिका पादुकोणच्या गाण्यावर इरिना थिरकली होती. इरिनाच्या या व्हिडीओला लाखोहून व्ह्यूज मिळाले आहेत. तिचा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ ‘बिग बॉस मराठी’तील सदस्यांसह इतर कलाकार मंडळींदेखील लाइक केला आहे.

इरिना रुडाकोवालाच्या या डान्स व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “आपली इरिना भारी, आपला वैभव भारी…आयला आपल्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सगळेच सदस्य लय भारी.” यावर इरिनाने हार्ट इमोजी दिलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, गरबा संपला ताई. दिवाळी आली. या नेटकऱ्याला इरिना उत्तर देत म्हणाली, “हो मला माहित आहे.” तसंच बऱ्याच नेटकऱ्यांनी तिच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

Comments
Comments

दरम्यान, इरिना रुडाकोवाला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या चौथ्या आठवड्यातून घराबाहेर झाली होती. त्यानंतर काही दिवसांनीच इरिना ‘कलर्स मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत झळकली. ‘इंद्रायणी’ मालिकेत इरिना पाहायला मिळाली. सध्या ती आणि वैभव चव्हाण सतत एकत्र पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी दोघं एकत्र विजेता सूरज चव्हाणच्या गावी गेले होते. त्यानंतर धनंजय पोवारच्याही घरीदेखील दोघं एकत्र दिसले होते.