आज(रविवार, ६ ऑक्टोबर) बिग बॉस मराठी ५ चा महाअंतिम सोहळा पार पडला. कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. ती बाहेर पडताच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.

कलर्स मराठीने अंकिता वालावलकर बिग बॉसचा निरोप घेत असल्याचे इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केले. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घेऊयात नेटकऱ्यांनी काय म्हटले आहे.

काय म्हणाले नेटकरी?

एका नेटकऱ्याने, “तू आमचं मन नक्कीच जिंकलंस, जसं तू खेळलीस आणि अखेरपर्यंत बी टीमला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलास, ते खरंच कौतुकास्पद आहे, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो!”, असे म्हणत अंकिताच्या खेळाचे कौतुक केले आहे. एक नेटकरी म्हणतो, “बिग बॉसने गेम केला, अंकिता टॉप ३ मध्ये असायला पाहिजे होती, निक्कीला वरती घेतले”, दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “खरं व्यक्तीमत्व, शेवटपर्यंत एकी ठेवलीस, एकटी लढत राहून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर केलंस, खूप चांगलं खेळलीस’. एका नेटकऱ्याने म्हटले, “अंकिता खरं तर जिंकायला हवी होती. ती खूप छान खेळली आणि तिला मतेदेखील चांगली होती.” आणखी एका नेटकऱ्याने, “आमच्यासाठी अंकिता विजेता आहे”, असे म्हटल्याचे पाहायला मिळाले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “तू शेवटपर्यंत तू तुझ्या निर्णय क्षमतेवर ठाम राहिलीस.आमच्यासाठी तूच विनर होतीस, आहेस आणि राहशील. तर अनेकांनी अंकिता टॉप ३ मध्ये असायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

इन्स्टाग्राम

प्रेक्षकांची बिग बॉसवर नाराजी

अंकिता वालावलकर घरातून बाहेर पडल्यानंतर नेटकऱ्यांनी बिग बॉसच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी हा चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. एक नेटकरी म्हणतो, “इथून पुढे बिग बॉसचा कोणताच सीझन बघणार नाही”, दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “निक्कीचा बिग बॉस आहे, त्यामुळे अंकिता बाहेर आली, वाईट झालं, चुकीचं आहे सगळं.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “आमच्यासाठी विजेता अंकिताच आहे. चुकीचा निर्णय आहे बिग बॉसचा. वोटिंग वैगेरे दिखावा आहे सगळा.” एक नेटकरी म्हणतो, “बिग बॉसने वोटिंगचा मान राखला नाही. सगळे त्याच्या मनाने निर्णय घेतले.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “निक्कीला विजयी घोषित करून टाका, उगाच आपलं टॉप ५, टॉप ६ नाटक करायचं.” तर काही नेटकऱ्यांनी अंकिताऐवजी निक्की घराबाहेर जायला पाहिजे होती, असे म्हटले आहे.

हेही वाचा: Video: आलिया भट्टला Bigg Boss Marathi ची भुरळ! मंचावर येऊन मराठीत म्हणाली, “रितेश भाऊ…”

दरम्यान, अंकितानंतर धनंजय पोवारदेखील घराबाहेर पडला आहे. धनंजय आणि अंकिताची बिग बॉसमधील मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.