Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ या शोमध्ये पहिल्याच आठवड्यात घरातील स्पर्धकांमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. एकाबाजूला निक्की, जान्हवी, अरबाज, वैभव आहेत. तर, दुसरीकडे वर्षा, अंकिता, सूरज, अभिजीत, योगिता, धनंजय, इरिना हे स्पर्धक स्वतंत्रपणे खेळत आहेत. उरलेले इतर स्पर्धक दोन्ही गटांबरोबर समन्वय साधून आहेत. अशातच आता निक्की – जान्हवीच्या मैत्रीत अवघ्या आठवड्याभरातच फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. याचा प्रोमो ‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केला आहे.
निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर ‘बिग बॉस’च्या घरातील पहिल्या नॉमिनेशन प्रकियेपासून एकत्र आहेत. दोघींनी वेगळा गट तयार केला होता. अगदी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सुद्धा जान्हवीला “निक्कीची सावली बनून खेळू नकोस” असा सल्ला दिला होता. यानंतर आता लगेच दोघींमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सोमवारी रात्री प्रदर्शित होणाऱ्या भागात बीबी करन्सीवरून मोठा राडा होणार आहे. अरबाज एका फुटेजमध्ये सूरज चव्हाणची बीबी करन्सी चोरत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे घरात दोन्ही गटांमध्ये जोरदार भांडणं होणार आहेत. अशातच आणखी एका प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये जान्हवीला अश्रू अनावर झाल्याचं दिसतं आहे.
हेही वाचा : Happy Birthday बायको! रितेशने जिनिलीयाला दिल्या हटके शुभेच्छा, रोमँटिक नव्हे तर शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Bigg Boss च्या घरात जान्हवीला अश्रू अनावर
‘बिग बॉस’च्या घरात निक्की व जान्हवीच्या मैत्रीत फूट पडणार आहे. जान्हवी भावुक होत वैभव आणि इरिनाला सांगते, “मला हे लोक आवडत नाहीयेत…हे खूप खोटं वागतात. आपण गोष्टी करतो आणि निक्की फक्त क्रेडिट घेऊन जाते. पूर्ण प्लॅनिंग माझं होतं…निक्कीच्या डोक्यात पण ही गोष्ट आली नसेल”
‘बिग बॉस’च्या या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपलं मत मांडलं आहे. “निक्की आणि अरबाज खूप चालू आहेत… ते दोघं मिळून वैभव-जान्हवीचा गेम करणार”, “चला उशिरा का होईना अक्कल आली”, “सर्व नाटक चालू आहे”, “निक्की तुमची चांगलीच वाट लावणार आहे” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’मध्ये आता येत्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडेल. आता कोणते सदस्य नॉमिनेट होणार, कोण कोणाला मदत करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.