‘बिग बॉस मराठी’चं पाचव्या पर्व गाजवणारी ‘किल्लर गर्ल’, ‘टास्क क्वीन’ अर्थात जान्हवी किल्लेकर सध्या खूप चर्चेत असते. ‘बिग बॉस मराठी’ संपल्यापासून जान्हवी ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, तसंच नव्या चित्रपटाच्या प्रिमियर सोहळ्यात दिसते. अलीकडेच जान्हवी घनःश्याम दरवडेच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या कुटुंबासह त्याच्या गावी शुभेच्छा देण्यासाठी गेली होती. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यानंतर आता जान्हवी किल्लेकरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर लवकरच्या नव्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकेत जान्हवी झळकणार आहे. याचा खुलासा ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमाच्या नव्या प्रोमोमधून झाला आहे.
‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘आता होऊ दे धिंगाणा ३’चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक चोर सिद्धार्थ जाधवकडे येतो आणि सांगतो की, मी एक चोर असून मला मॅडमनी खूप मारलं आहे. तेव्हा सिद्धार्थ विचारतो, “तुला कोणी मारलं?” तर चोर म्हणतो, “पोलीस मॅडमने मारलं.” त्यानंतर जान्हवीची जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली आहे. यावेळी सिद्धार्थ जाधव म्हणतो की, स्वागत करुया इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील अर्थात जान्हवी किल्लेकरचं.
‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या या भागात ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘अबोली’ मालिकेची टीम सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी ‘अबोली’ मालिकेच्या टीमच्या कलाकारांनी फिकट गुलाबी रंगाचे आउटफिट घातले आहेत. तसंच जान्हवीने देखील फिकट गुलाबी रंगाचा आउटफिट घातला आहे. त्यामुळे जान्हवी किल्लेकरची ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, याआधी जान्हवी किल्लेकर ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती, जी चांगलीच गाजली. तसंच जान्हवीने अल्बम साँगमध्ये काम केलं होतं.